आदित्य बोराटे

इंदापूर: इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य भुसार बाजारात ज्वारीला प्रतिक्विंटल १० हजार ५११ रुपयांचा दर मिळाला असून, भिगवण उपबाजारात बाजरी आणि गव्हालाही चांगला भाव मिळाला आहे. भिगवणमध्ये बाजरीची प्रतिक्विंटल ४ हजार ५०१ रुपये, तर गव्हाची ४ हजार ०५१ रुपये दराने विक्री झाली. याशिवाय इंदापूर बाजारात कांद्याला प्रतिक्विंटल ५ हजार रुपयांचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीने दिली.

इंदापूरच्या मुख्य भुसार बाजारात जयसिंग चंदनकर यांच्या आडत दुकानावर ज्वारीची प्रतिक्विंटल १० हजार ५११ रुपये दराने विक्री झाली. तर भिगवण उपबाजारात दीपक मचाले यांच्या आडत दुकानावर बाजरीला ४ हजार ५०१ रुपये आणि गव्हाला ४ हजार ०५१ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. हे दर राज्यातील विक्रमी असल्याचे बाजार समितीच्या वतीने सांगण्यात आले.

या वेळी उदय शहा, रविंद्र चंकेश्वरा, अनिल भंडारी, रोहित गुळवे, कृष्णल मिसाळ, राहुल देशमुख, नामदेव शिरसट, कोळेकर यांच्यासह अन्य व्यापारी उपस्थित होते.
कांदा आणि फळांनाही उच्चांकी दर
इंदापूरच्या मुख्य बाजारात मागील सप्ताहात कांद्याला प्रतिक्विंटल ५ हजार रुपयांचा दर मिळाला. फळांच्या बाजारातही चांगले दर नोंदविण्यात आले. डाळिंबाला प्रतिकिलो ३७१ रुपये, पेरूला ९१ रुपये, ड्रॅगन फ्रूटला ८१ रुपये, सीताफळाला ८० रुपये, संत्र्याला ६० रुपये आणि मोसंबीला ५५ रुपये दर मिळाला. बाजार समितीचे सभापती संदीप पाटील आणि उपसभापती रुपालीताई संतोष वाबळे यांनी ही माहिती दिली.
शेतकऱ्यांनी परवानाधारक व्यापाऱ्यांशीच व्यवहार
इंदापूर बाजार समितीच्या मुख्य बाजारासह उपबाजारांमध्ये शेतीमालाला मिळणाऱ्या दरांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आपला माल बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणावा, असे आवाहन सभापती संदीप पाटील यांनी केले.
शेतकऱ्यांनी शासनाचा किंवा बाजार समितीचा वैध खरेदी-विक्री परवाना असलेल्या व्यापाऱ्यांशीच व्यवहार करावेत. परवाना नसलेल्या व्यापाऱ्यांकडे शेतीमाल विकल्यास आर्थिक फसवणुकीचा धोका संभवतो. त्यामुळे व्यवहार करताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी. तसेच बाजार समितीने उपलब्ध करून दिलेल्या सोयी-सुविधा आणि विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही पाटील यांनी केले.
या वेळी माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे, माजी आमदार तथा संचालक यशवंत (तात्या) माने, विलासराव माने, दत्तात्रय फडतरे, मधुकर भरणे, तुषार जाधव, मनोहर ढुके, रोहित मोहोळकर, संग्रामसिंह निंबाळकर, मंगलताई गणेशकुमार झगडे, आबा देवकाते, संतोष गायकवाड, अनिल बागल, दशरथ पोळ, सुभाष दिवसे, रोनक बोरा आणि बाजार समितीचे सचिव संतोष देवकर उपस्थित होते.







