लोणी काळभोर, ता. 24 : घरात महालक्ष्मीची पूजा सुरू असताना देवीच्या मूर्तीला घातलेले सुमारे 7 तोळे वजनाचे सोन्याचे गंठण गायब झाल्याची घटना लोणी काळभोर येथील रामदरा रोड परिसरात उघडकीस आली आहे. या गंठणाची चालू बाजार भावाप्रमाणे किंमत 10 लाखांहून अधिक असून, ते चोरीला गेल्याचा संशय एका परिचित महिलेवर व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधित महिलेविरोधात तक्रार अर्ज दिल्यानंतर आता फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

याप्रकरणी सचिन शिरीष खुने (वय 42, रा. साई शांती सोसायटी, रामदरा रोड, लोणी काळभोर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खुने हे हडपसर येथील किर्लोस्कर कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून नोकरी करतात. त्यांनी 2024 मध्ये पत्नीकरिता 6 तोळे 8 ग्रॅम 710 मिलीग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण खरेदी केले होते. श्रावण महिन्यात दर शुक्रवारी त्यांच्या घरी महालक्ष्मीची पूजा केली जात होती. 4 सप्टेंबर रोजीही देवीची पूजा करून सोन्याचे दागिने मूर्तीवर चढविण्यात आले होते.

दर्शनासाठी आलेल्या महिलेवर संशय
5 सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास त्यांची पूर्वपरिचित मांजरी येथील 39 वर्षित महिला या दर्शनासाठी घरी आल्या. त्यांनी देवघरात जाऊन देवीचे दर्शन घेतले आणि त्यानंतर खुने यांच्या पत्नीसोबत हॉलमध्ये गप्पा मारल्या. दरम्यान, सकाळी साडेअकराच्या सुमारास खुने यांच्या पत्नीची मैत्रीण मोहिनी जगताप या डाळ घेण्यासाठी घरी आल्या. मांजरीतील महिला आणि जगताप यांच्यात पूर्वीपासून मतभेद आहेत. त्यानंतर मांजरीतील महिला पुन्हा देवघरात गेल्या. जगताप यांनी देवघराच्या दरवाजातून त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला; मात्र प्रतिसाद मिळाला नसल्याचे फिर्यादीत नमूद आहे. दुपारी बाराच्या सुमारास मांजरीतील महिला या घरातून निघून गेल्या. त्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास खुने यांच्या पत्नी देवघरातील पूजा काढण्यासाठी गेल्या असता, देवीच्या मूर्तीच्या गळ्यात घातलेले सोन्याचे गंठण गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

तक्रार अर्जानंतर पोलिसांत फिर्याद
गंठण गायब झाल्यानंतर खुने यांच्या पत्नीने त्यांना फोनवरून माहिती दिली. घरातील घटनाक्रमाच्या आधारे मांजरीतील महिलेवर चोरीचा संशय व्यक्त करत खुने यांनी 8 सप्टेंबर रोजी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यानंतर 19 ऑक्टोबर रोजी त्यांनी याप्रकरणी जबाब दिला. दरम्यान, संबंधित महिलेनेच गंठण चोरल्याचा संशय हा फिर्यादीचा आरोप असून, चोरीचा आरोप अद्याप सिद्ध झालेला नाही. या प्रकरणात पोलिसांच्या तपासातून नेमके काय समोर येते, याकडे लक्ष लागले आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अण्णा माने करत आहेत.






