लोणी काळभोर, ता. 24 : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एमआयटी महाविद्यालयात शिक्षण घेणारी 20 वर्षीय विद्यार्थिनी बेपत्ता झाली आहे. 13 ऑक्टोबर रोजी सकाळी महाविद्यालयात जाण्यासाठी घरातून निघालेली सृष्टी अद्याप घरी परतलेली नाही. कुटुंबीयांनी नातेवाईकांकडे आणि परिचितांकडे शोध घेऊनही तिचा ठावठिकाणा लागला नाही.

सृष्टी मोहन येळे (वय 20, रा. गणराज बिल्डिंग, साईनगरी, चंदननगर, पुणे). असे बेपत्ता झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी तिच्या वडिलांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सृष्टी ही एमआयटी महाविद्यालयात बीबीएच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत आहे. 13 ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास ती आपली मैत्रीण गौरी शिवले हिच्यासोबत दुचाकीवरून महाविद्यालयात जाण्यासाठी घरातून निघाली होती. सकाळी साडेआठ वाजता सृष्टीने आईला फोन करून महाविद्यालयात पोहोचल्याचे सांगितले होते.

मात्र, दुपारी एक वाजण्याच्या सुमारास तिच्या आईने फोन केला असता सृष्टीचा मोबाईल बंद असल्याचे आढळले. त्यामुळे कुटुंबीयांची चिंता वाढली. वडिलांनी तातडीने महाविद्यालयात जाऊन चौकशी केली. त्यावेळी सृष्टी महाविद्यालयात आली नसल्याचे तिच्या मैत्रिणींनी आणि वर्गशिक्षकांनी सांगितले. तिच्या मैत्रिणीने तिला महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ पाहिल्याचे सांगितले; मात्र त्यानंतर ती कुठे गेली, याची माहिती मिळू शकली नाही.
कुटुंबीयांनी नातेवाईकांकडे तसेच परिचितांकडे शोध घेतला. मात्र, सृष्टीचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. अखेर तिच्या वडिलांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे.
बेपत्ता विद्यार्थिनीचे वर्णन : रंग गोरा, उंची सुमारे 5 फूट 4 इंच, बांधा सडपातळ. बेपत्ता झाली त्या वेळी तिने पांढऱ्या रंगाची पँट, काळ्या रंगाचा टॉप आणि काळ्या रंगाचे जॅकेट परिधान केले होते. तिच्या गळ्यात सोन्याची साखळी होती. सृष्टीबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा लोणी काळभोर पोलिसांशी संपर्क साधावा.






