लोणी काळभोर, ता. 24: लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एमआयटी महाविद्यालयात आयोजित गरबा कार्यक्रमानंतर घरी पायी निघालेल्या विद्यार्थ्याला शिवीगाळ करून बेल्ट आणि लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे. 16 ऑक्टोबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरील रेल्वे पुलाजवळ हा प्रकार घडला. या प्रकरणी महाविद्यालयातील एका ओळखीच्या विद्यार्थ्यासह त्याच्या दोन साथीदारांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनराज सुधीर कदम (वय 20, मूळ रा. शामनगर, नांदेड) हा लोणी काळभोर येथील एमआयटी महाविद्यालयात बी.टेक. (फूड टेक्नॉलॉजी) प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. तो लोणी काळभोर परिसरात आपल्या सहकारी विद्यार्थ्यांसोबत राहतो. 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत एमआयटी महाविद्यालयाच्या परिसरात गरबा नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात धनराज आपल्या मित्रांसह सहभागी झाला होता. कार्यक्रम संपल्यानंतर रात्री दहाच्या सुमारास तो राहत्या ठिकाणी जाण्यासाठी पायी निघाला.
दरम्यान, रात्री साडेदहाच्या सुमारास महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरील रेल्वे पुलाजवळ तो आला असता, महाविद्यालयातील त्याच्या ओळखीचा विद्यार्थी व्यंकटेश टोपारे आणि त्याचे दोन साथीदार त्याच्याजवळ आले. गरबा कार्यक्रमादरम्यान जास्त मस्ती केली होती का, असे म्हणत व्यंकटेशने त्याला शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.

धनराजने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता, व्यंकटेशने कमरेचा बेल्ट काढून त्याच्या डाव्या हातावर फटके मारले. तर त्याच्यासोबत असलेल्या दोघांनी लाकडी दांडक्याने धनराजच्या चेहऱ्यावर आणि पाठीवर मारहाण केली. या हल्ल्यात त्याच्या नाकातून रक्त येऊ लागले. त्यानंतर तिघेही घटनास्थळावरून पळून गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

जखमी धनराजने उपचारासाठी ससून रुग्णालय गाठले. तेथे उपचार घेतल्यानंतरही त्रास होत असल्याने तो काही काळ घरीच विश्रांती घेत होता. त्यानंतर 20 ऑक्टोबर रोजी त्याने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. या प्रकरणात व्यंकटेश टोपारे आणि त्याच्या दोन अनोळखी साथीदारांविरोधात तक्रार देण्यात आली असून, घटनेमागील नेमके कारण आणि पुढील कारवाईबाबत पोलिसांकडून तपास केला जाण्याची शक्यता आहे.







