छत्रपती संभाजीनगर : मुकुंदवाडी परिसरातील राजनगर भागात एक अत्यंत संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. दारूच्या नशेत असलेल्या एका पतीने स्वतःच्या पत्नीला केवळ ‘तू चांगली का राहतेस?’ असं म्हणत वाद घातला. याच कारणावरून पुढे येत त्याने लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कविता गंमतीदास काळे (वय 32) असे या प्रहार झालेल्या पत्नीचे नाव आहे, तर गंमतीदास व्यंकट काळे असे आरोपी पतीचे नाव आहे. रविवारी घडलेल्या या घटनेच्या वेळी आरोपी पती दारूच्या नशेत घरी आला होता. कसलेही ठोस कारण नसताना त्याने पत्नीसोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली आणि थेट ‘तू इतकी चांगली का राहतेस?’ असा अजब जाब विचारत वाद घातला. वादाचे रूपांतर लवकरच हिंसेत झाले आणि संतापलेल्या पतीने घरात असलेल्या लाकडी दांडक्याने कविता यांच्या हातावर, पायावर तसेच पाठीवर सपासप वार केले.
या अचानक झालेल्या हल्ल्यात कविता गंभीर जखमी झाल्या. घरातील आरडाओरडा ऐकून भांडण सोडवण्यासाठी त्यांची सून, नणंद आणि भाची धावून आल्या. मात्र, आरोपीने कोणाचाही संकोच न बाळगता मध्यस्थी करणाऱ्या या महिलांनाही मारहाण केली. एवढेच नव्हे तर, जर या घटनेची वाच्यता कोणाजवळ केली किंवा पोलिसांत तक्रार दिली, तर थेट जीवे मारण्याची धमकीही त्याने दिली.

या सर्व प्रकारामुळे घाबरलेल्या मात्र धाडस दाखवत कविता काळे यांनी थेट मुकुंदवाडी पोलीस ठाणे गाठले आणि आपल्या पतीविरोधात रीतसर तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, प्रकरणाचा पुढील तपास हवालदार जाधव यांच्यामार्फत सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे







