पुणे : पुणे शहराचे सौंदर्य वाढवण्यासाठी आणि शिस्त आणण्यासाठी पुणे महानगरपालिकेने एक नवीन प्रस्ताव विचाराधीन ठेवला आहे. मुख्य रस्त्यांवर असलेल्या इमारतींच्या बाल्कनीत किंवा खिडक्यांमध्ये कपडे वाळत घालण्यावर निर्बंध आणण्याची ही योजना आहे. महापालिका आयुक्तांनी एका अंतर्गत कार्यक्रमात या मुद्द्यावर भाष्य केल्यानंतर या चर्चेला सुरुवात झाली आहे. याला पुणेकरांनी जोरदार विरोध केला आहे

रस्त्यावरून जाताना बाल्कनीत दिसणारे कपडे शहराच्या सौंदर्यास बाधक ठरत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे असून नागरिकांनी शहर स्वच्छतेसाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मात्र, या संभाव्य निर्णयामुळे पुणेकरांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. सध्या शहरात पिण्याच्या पाण्याची समस्या, खराब रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांचे प्रश्न गंभीर आहेत. नागरिक आधीच दैनंदिन अडचणींचा सामना करत आहेत. अशा वेळी महापालिकेने मूलभूत समस्या सोडवण्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
बाल्कनीत कपडे वाळत घालणे ही प्रत्येक घरातील गरज असल्याने अशा निर्बंधांपेक्षा प्रशासनाने नागरी सुविधांवर भर द्यावा, अशी भूमिका नागरिकांनी घेतली आहे. प्रशासनाचा हा प्रस्ताव प्रत्यक्षात येणार का आणि यावर अंतिम निर्णय काय घेतला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे








