आदित्य बोराटे

इंदापूर: पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी पुणे येथे २१ व २२ ऑक्टोबर रोजी झालेल्या जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत इंदापूर तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या सौ. कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली. विद्यालयाची विद्यार्थिनी भक्ती सोमनाथ बोराटे हिने ४०० मीटर हर्डल्स प्रकारात पुणे जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावत विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड मिळवली. तिच्या या यशामुळे विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या स्पर्धेत विद्यालयाच्या अन्य खेळाडूंनीही आपल्या कौशल्याची छाप उमटवली. १४ वर्षांखालील मुलींच्या ४ बाय १०० मीटर रिले प्रकारात संघाने द्वितीय क्रमांक मिळवला. साईराज गायकवाड याने १०० मीटर आणि २०० मीटर धावण्याच्या दोन्ही प्रकारांत तृतीय क्रमांक पटकावला. कीर्ती बोराटे हिने ८० मीटर हर्डल्समध्ये, तर तृप्ती बोराटे हिने १०० मीटर धावण्याच्या प्रकारात तृतीय क्रमांक मिळवून विद्यालयाच्या यशात भर घातली.

या खेळाडूंना क्रीडा शिक्षक सुनील मोहिते आणि पालक रणजीत सातपुते यांचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंनी मिळवलेल्या या यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य संजयकुमार शिंगारे, शाळा समिती सदस्य विजय शिंदे, विठ्ठल ननवरे, कैलास कदम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील जाधव, पर्यवेक्षिका पुष्पा काळे, माजी विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले.

भक्ती बोराटे हिची विभागीय स्पर्धेसाठी झालेली निवड आणि अन्य खेळाडूंनी मिळवलेले यश यामुळे कदम विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.







