पुणे : परिसरात भाईगिरी करण्याच्या वादातून आणि खुन्नसने पाहत असल्याच्या संशयावरून १६ वर्षीय मुलावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, तिघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ल्यात अल्पवयीन मुलगा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर वारजे येथील माई मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अटक केलेल्या आरोपींची नावे सुशांत विलास ढिले (वय ३२, रा. भवानी माता कॉम्प्लेक्स, उत्तमनगर) आणि सचिन राजू मारणे (वय २६, रा. एनडीए चौकीमागे, उत्तमनगर) अशी आहेत. ही घटना २३ ऑक्टोबर रोजी रात्री आठच्या सुमारास शिवणे येथील गुरुपुष्प रेसिडेन्सीसमोरील मोकळ्या जागेत घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दोन दिवस आधी जखमी मुलगा आणि त्याचा मित्र दुचाकीवरून जात होते. त्यावेळी सुशांत ढिले याने त्यांच्या दुचाकीसमोर येऊन त्यांना अडवले. ‘तुम्ही माझ्याकडे काय बघता? मी इथला भाई आहे. माझ्या नादाला लागू नका,’ अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. मात्र, या वेळी मुलाने त्याच्याशी वाद घातला नव्हता.

त्यानंतर २३ ऑक्टोबरच्या रात्री जखमी मुलगा आपल्या दोन मित्रांसह गुरुपुष्प रेसिडेन्सीसमोरील मोकळ्या जागेत बसून मोबाईलवर गेम खेळत होता. त्याचवेळी सुशांत ढिले, सचिन मारणे आणि त्यांचा आणखी एक साथीदार तेथे आले. सुशांतने मुलाकडे बोट दाखवत, ‘हाच तो काळा टी-शर्टवाला आहे, जो माझ्याकडे खुन्नसने बघतो. आज याला जिवंत सोडायचे नाही,’ असे म्हटल्याचे पोलिसांनी सांगितले.

यानंतर सुशांतने कोयत्याने मुलाच्या डोक्यावर दोन वार केल्याचा आरोप आहे. तर सचिन मारणे याने धारदार हत्याराने त्याच्या दोन्ही हातांवर वार केले. या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला.
रक्तबंबाळ अवस्थेतही मुलाने घटनास्थळावरून पळ काढत समोरील ओम साई ड्रायक्लिनर्स या दुकानात आश्रय घेतला. हल्लेखोर निघून गेल्यानंतर त्याला उपचारासाठी माई मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी उत्तमनगर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.







