डॉ. अशोक बालगुडे

पुणे : गाव पाथर्डीचे; कर्तृत्वाचा ठसा देशाच्या पोलीस प्रशासनावर आणि आता जबाबदारी तेलंगणाच्या राजधानीची! अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डीचे सुपुत्र, वरिष्ठ आयपीएस अधिकारी महेश मुरलीधर भागवत यांची हैदराबादच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. महाराष्ट्राच्या मातीत घडलेल्या या अधिकाऱ्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
तेलंगणा सरकारने १२ नोव्हेंबरला २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले. त्यामध्ये पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) पदावर कार्यरत असलेल्या भागवत यांच्याकडे हैदराबादच्या पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यांनी १३ नोव्हेंबरला पदभार स्वीकारला. ते हैदराबादचे ६३ वे पोलीस आयुक्त ठरले आहेत.

भागवत यांच्या नियुक्तीचे नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी विशेष शब्दांत स्वागत केले. यूपीएससीचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो तरुणांचे ते मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान आहेत. निःस्वार्थ सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समर्पित वृत्तीने त्यांनी अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली आहे, अशा शब्दांत नांगरे-पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले.

१९९५ च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी असलेल्या भागवत यांनी मानवी तस्करीविरोधातील मोहिमेत उल्लेखनीय काम केले आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील महिला व बालकांच्या तस्करीविरोधात त्यांनी प्रभावी कारवाई केली. या कार्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली. अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने २०१७ मध्ये त्यांना ‘ट्रॅफिकिंग इन पर्सन्स रिपोर्ट हिरो’ पुरस्काराने गौरविले होते. यापूर्वी त्यांनी रचकोंडा पोलीस आयुक्त म्हणूनही काम पाहिले आहे.
पाथर्डीत शालेय शिक्षण, पुण्यात अभियांत्रिकीचे शिक्षण आणि तेलंगणात पोलीस सेवेचा प्रदीर्घ प्रवास, अशी त्यांची कारकीर्द आहे. विशेष म्हणजे, यूपीएससीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे कामही ते सातत्याने करतात.
हैदराबादसारख्या महानगरात कायदा-सुव्यवस्था राखणे, महिला सुरक्षा आणि सायबर गुन्हेगारीला आळा घालणे ही त्यांच्यासमोरील प्रमुख आव्हाने असतील. गावाच्या मातीत रुजलेली पावले आता महानगराच्या पोलीस दलाचे नेतृत्व करणार आहेत. कर्तृत्वाला गावाची सीमा नसते, याचीच भागवत यांची कारकीर्द साक्ष देत आहे!






