लोणी काळभोर, ता. २५ : फुरसुंगीतील वीज समस्यांचे ग्रहण लोणी काळभोर आणि कदमवाकवस्तीच्या नागरिकांची पाठ सोडायला तयार नाही. गेल्या महिनाभरापासून महावितरणकडून विविध कामे सुरू असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात दोन्ही गावांतील नागरिकांना वारंवार वीज खंडित होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. दर गुरुवारी देखभाल-दुरुस्तीची कामे केली जात असतानाही वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने महावितरणच्या नियोजनावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

फुरसुंगीतील अडचणी काही केल्या सुटेना आणि लोणी काळभोरला पूर्णवेळ वीज मिळेना, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे. कधी वीजवाहिन्या तुटतात, तर कधी विद्युत खांब बदलण्याचे काम सुरू असते. भूमिगत वीजवाहिन्यांमध्ये बिघाड होणे, डीपीमध्ये तांत्रिक समस्या निर्माण होणे किंवा एखादा फेज बंद पडणे, अशा विविध कारणांमुळे वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याच्या तक्रारी आहेत.
वीज जाते, पाणीपुरवठाही ठप्प!
वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याचा सर्वाधिक फटका नागरिकांच्या दैनंदिन जीवनाला बसत आहे. वीज नसल्याने पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडत असून, नागरिकांसमोर पाण्याचा प्रश्नही गंभीर होत आहे. घरातील विद्युत उपकरणे बंद पडणे, ऑनलाइन कामांमध्ये अडथळे येणे आणि व्यावसायिक कामकाज विस्कळीत होणे, अशा अनेक समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे.

ऑक्टोबरच्या उकाड्यात नागरिकांची कोंडी
ऑक्टोबर महिन्यातील उकाड्यामुळे आधीच नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच वारंवार वीज गायब होत असल्याने घरात राहणेही कठीण झाले आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि गृहिणींना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पंखे बंद पडल्याने उकाड्याचा त्रास वाढत असून, डासांचा प्रादुर्भावही नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

महावितरणच्या देखभाल-दुरुस्तीचा उपयोग काय?
दर गुरुवारी देखभाल-दुरुस्तीची कामे करूनही वीजपुरवठा वारंवार खंडित होत असेल, तर या कामांचा नेमका उपयोग काय, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. तांत्रिक बिघाडांची वारंवार पुनरावृत्ती होत असल्याने कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जात आहेत की केवळ तात्पुरती मलमपट्टी, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. महावितरणने फुरसुंगी परिसरातील तांत्रिक अडचणींचा कायमस्वरूपी निपटारा करून लोणी काळभोर आणि कदमवाकवस्ती येथील वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी ठोस नियोजन करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, वारंवार वीज खंडित होण्याच्या या समस्येतून नागरिकांची सुटका होणार तरी कधी? महावितरण प्रशासनाने आता तरी जागे होऊन कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.






