पुणे: पुणे, पिंपरी-चिंचवडसह पुणे जिल्ह्यातील पाणीवाटपाबाबत लवकरच महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. धरणांमधील पाणीसाठा मागील वर्षाच्या तुलनेत कमी असल्याने शहरातील नागरिकांसह शेती आणि औद्योगिक क्षेत्राच्या पाणीपुरवठ्याचं नियोजन करण्याचं आव्हान प्रशासनासमोर आहे. यासंदर्भात ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस कालवा सल्लागार समितीची बैठक होणार आहे.

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण प्रकल्पातील 4 धरणांमध्ये सध्या 24.67 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. हा साठा एकूण क्षमतेच्या 84.63 टक्के आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत धरणांमध्ये सुमारे 99 टक्के पाणी उपलब्ध होते. त्यामुळे यंदा पाण्याचा वापर जपून करण्याची गरज निर्माण झाली आहे.

राज्य सरकारने यापूर्वीच 10 टक्के पाणीकपातीचे निर्देश दिले आहेत. तसेच पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी 20 टक्के कपातीची सूचना केली आहे. मात्र, अंतिम पाणीवाटप आणि कपातीचे स्वरूप कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार असतील. जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीही उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
पावसातील खंड आणि एल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे पाणीसाठ्याचे नियोजन अधिक महत्त्वाचे ठरले आहे. उपलब्ध पाणी काटकसरीने वापरल्यास पुढील वर्षी 31 पर्यंत पुरवठा सुरू ठेवण्याचे उद्दिष्ट प्रशासनासमोर आहे.
बैठकीत पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देऊन शेती, एमआयडीसी आणि औद्योगिक क्षेत्राला किती पाणी द्यायचे, यावर चर्चा होणार आहे. त्यामुळे आगामी काळात पाणीकपात वाढणार की सध्याचे नियोजन कायम राहणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.






