पुणे : पायी जाणार्या तडीपार गुंडाचा तोल गेला असता तो दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेच्या दुचाकीचा आधार घेतला. त्यानंतर उलट या तडीपार गुंडाने महिलेलाच शिवीगाळ करायला सुरुवात केली़. तुम्ही शिवीगाळ का करता असे महिलेने विचारले असता गुंडाने कोयता काढून महिलेलाच धमकावत परिसरात दहशत पसरवल्या प्रकरणी लष्कर पोलिसांनी या तडीपार गुंडाला बेड्या ठोकल्या आहेत.

मलंग मेमन (वय २९ वर्ष,रा. भिमपुरा, कॅम्प) असे या तडीपार गुंडाचे नाव आहे. पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी मलंग मेमन याला दोन वर्षासाठी तडीपार केले आहे. असे असतानाही तडीपारीच्या आदेशाचा भंग करुन तो शहरात फिरत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार फुलवाला चौकाकडे जाणार्या रोडवर भोपळे चौकाच्या अलिकडे रविवारी (१ जून) रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडला. याबाबत एका ४५ वर्षीय महिलेकडून लष्कर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या दुचाकीवरुन जात होत्या. गुंड आरोपी मलंग मेमन हा रस्त्याने पायी चलत जात होता. त्यावेळी त्याचा तोल गेला तेंव्हा तो फिर्यादी यांच्या दुचाकीचा आधार घेऊन थांबला. कसलेही कारण नसताना आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ करुन गाडी धीरे चालव मॅडम असे म्हणाला. त्यावर फिर्यादी यांनी मलंग याला शिवीगाळ का करताय? असे विचारले.
याचा राग धरून या गुंडाने त्यांच्या कंबरेला असलेला कोयता काढून ‘‘मुझसे जबान लडाती है, रुक साली तेरे को दिखाता हूं, आज तुझे जिंदा नही छोडुंगा’’ असे म्हटले. या प्रकारामुळे घटनास्थळावरून आजूबाजूचे लोक भितीने पळून गेले.
या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच लष्कर पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले. त्यानंतर त्यांनी दहशत पसरविणार्या मलंग या तडीपार गुंडाला बेड्या ठोकल्या. पोलीस हवालदार बनसोडे तपास करीत आहेत.







