मुंबई : विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठं यश मिळालं आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला मात्र मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. महायुतीनं राज्यात 23 जागांवर विजय मिळवला आहे. तर महाविकास आघाडीला या निवडणुकीमध्ये केवळ 50 चाच आकडा गाठता आला आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी कोणत्याही पक्षाकडे विधानसभेच्या एकूण जागांपैकी दहा टक्के जागांची आवश्यकता असते. म्हणजे महाराष्ट्रात कोणत्याही पक्षाला विरोधी पक्षनेतेपद हवं असेल तर त्याला किमान 29 जागांची आवश्यकता असते, मात्र महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्ष राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाला हा आकडा गाठता आलेला नाही.
त्यानंतर आता पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मोठं विधान केलं आहे. महापालिकेच्या निवडणुका या जर मतपत्रिकेवर घेतल्या नाहीत तर आम्ही निवडणुकीवर बहिष्कार घालू असा इशारा त्यांच्याकडून देण्यात आला आहे. तसेच देशात सध्या हुकूमशाही सुरू असल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
मुख्यमंत्रिपदावरून शिंदेंना डिवचलं..
आज महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी मुख्यमंत्रिपदाबाबतची आपली भूमिका मांडली. एकनाथ शिंदे यांनी सीएमपदावरून आपला दावा सोडला आहे. माझं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बोलणं झालं. मी त्यांना सांगितलं की असं कधीच वाटू देऊ नका कोणताही निर्णय घेण्यामध्ये माझी अडचण आहे. केंद्रीय नेतृत्वाचा निर्णय जसा भाजपला मान्य असेल तसा तो मलाही मान्य असेल, असं एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाला असं बोल जात आहे. मानलं जात आहे.
यावरून सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘इथे एकनाथ शिंदे यांचं दबावाचं राजकारण कामी आलं नाही. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपद स्वत:कडे ठेवण्याचा प्रयत्न केला. एकनाथ शिंदेंना इगो होता. भाजपनं उपकार केल्याचं शिंदे सांगतात. माझी मुख्यमंत्री पदाची कुवत नव्हती, विश्वासघाताच्या राजकारणाला साथ दिली, मी भाजपचा आभारी असल्याचं त्यांनी सांगितलं’ असा टोला यावेळी अंधारे यांनी शिंदेंना लगावला आहे.