पुणे: पुणे जिल्ह्यातील इंदापुरमध्ये एक मोठा कार्यक्रम आज पार पडला. या कार्यक्रमात मोठं नाराजीनाट्य पाहायला मिळालं. इंदापुरमध्ये आयोजित अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांना प्रेक्षकांमध्ये बसावं लागलं. मात्र याच कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे आणि मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व्यासपीठावर उपस्थित होते. तर या सरकारी कार्यक्रमात प्रोटोकॉलच पालन न केल्यामुळे सुप्रिया सुळेंनी नाराजी व्यक्त केली आहे.
अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात संवाद झाला नाही
या बाबत अधिक माहिती अशी की, इंदापुरमध्ये आयोजित अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांना प्रेक्षकांमध्ये बसावं लागल्यामुळे नाराजी नाट्य रंगले. सुळे या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार असूनही त्यांचं नाव कार्यक्रम पत्रिकेत नव्हतं. हा कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी खासदार सुप्रिया सूळेंनी स्थानिक मंत्री दत्तात्रय भरणे आणि इतर नेत्यांशी संवाद साधला, मात्र अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात संवाद झाला नाही. दोघांमध्ये दुरावा कायम असल्याचे पाहायला मिळाले.
खासदार सुप्रिया सुळे यांचा आरोप काय?
सुप्रिया सुळे म्हणाल्या “राज्यभरातील सरकारी कार्यक्रमांमध्ये विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना निमंत्रण दिले जात नाही” . या कार्यक्रमातही त्यांना प्रेक्षकांच्या पंक्तीमध्ये बसवण्यात आले होते. इंदापुरातील अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होत आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्यासह क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे व मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती हजर होते. इंदापूर तालुका हा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये येतो. बारामती मतदारसंघाच्या सुप्रिया सुळे या खासदार आहेत. पण त्यांना इंदापुरातील अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण नव्हतं. त्याबद्दल त्यांनी विरोधी पक्ष्याच्या लोकांना निमंत्रण दिलं जात नाही असं म्हणत नाराजी व्यक्त केली आहे. .