भिगवण : तक्रारवाडीत दोन गटांत झालेल्या मारहाणीत अकरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये परस्परविरोधी तक्रारी भिगवण पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आल्या आहेत. एका घटनेत पाच जणांनी पारधी समाजातील दाम्पत्यावर कोयत्याने वार केले. या प्रकरणी भिगवण पोलिसांनी अॅट्रॉसिटीसह इतर कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. तर, दुसऱ्या घटनेत राजेश दगडू मोरे यांच्या फिर्यादीवरून मारहाण करून सोन्याची चेन हिसकावून घेतल्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मालन शहाजी काळे यांच्या फिर्यादीवरून भिगवण पोलिसांनी पाच गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये किशोर हिरालाल गजरे, राजेश दगडू मोरे, हिरा गजरे, विनोद दगडू मोरे व गणेश मोहन परदेशी (सर्व रा. तक्रारवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. २३) सकाळी फिर्यादी महिला तिच्या पती व मुलासह उजनीच्या धरण क्षेत्रात मासेमारी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी गुन्हा दाखल झालेले पाच जण होडीतून आले आणि मुलीने केलेली बलात्काराची केस मागे घे, असे म्हणत या महिलेच्या पतीच्या पाठीवर कोयत्याने वार केले. पीडित महिला भांडण सोडवण्यासाठी गेले असता तिच्याही उजव्या मनगटावर कोयत्याने वार करण्यात आले. त्यानंतर पाच जणांनी लाथा-बुक्क्यांनी दोघांना मारहाण केली.
दुसऱ्या घटनेत पाण्यात टाकलेले माशाचे जाळे काढत असताना मासे पकडण्याची जागा आमची आहे. तू इथे कशासाठी आला आहे, असे म्हणून अजय काळे याने गजाने फिर्यादीला मारहाण केली. तर, शहाजी काळे याने स्वतःलाच कोयत्याने जखमी केले. तसेच फिर्यादीची तीन तोळ्यांची चेन लंपास केली. या प्रकरणी शहाजी रामा काळे, अजय शहाजी काळे, मालन शहाजी काळे, मनीषा शाहाजी काळे, दीपाली (पूर्ण नाव माहीत नाही), दीपाली हिचा नवरा (नाव माहीत नाही, सर्व रा. तक्रारवाडी, ता. इंदापूर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मिसाळ करीत आहेत.