लोणी काळभोर : सोरतापवाडी (ता.हवेली) येथील एका तरुणाने लोणी काळभोरमधील मावस भावाच्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना शनिवारी (ता.25) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. ओंकार नितीन सावंत (वय 24 वर्ष, रा. सोरतापवाडी तालुका हवेली जिल्हा पुणे) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ओंकार सावंत हा लोणी काळभोर येथील मावस भाऊ विशाल हंसराज वैश्य याच्याकडे शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आला होता. लोणी काळभोर येथे आठवडे बाजार असल्याने विशाल व त्याचे वडील हंसराज वैश्य हे नेहमीप्रमाणे बाजारात विमाळ माल विक्री करीत होते. त्यावेळी ओंकार हा वैश्य यांच्याकडे गेला आणि घरी जायचे आहे, असे सांगून घराची चावी घेऊन गेला.
दरम्यान, विशाल वैश्य हा शनिवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घरी गेला. तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. तेव्हा विशालने ओंकार सावंतला आवाज दिला व जोरात दरवाजा वाजविला. मात्र, आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर विशालने या घटनेची माहिती लोणी काळभोर पोलिसांनी दिली.
या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक पूजा माळी, पोलिस अंमलदार शिवाजी दरेकर, चक्रधर शिरगिरे व महिला पोलिस अश्विनी पवार हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने घराचा दरवाजा तोडला. तेव्हा ओंकार हा दोरीच्या साहाय्याने अँगलला गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी ओंकारला खाली उतरवले व उपचारासाठी एका खाजगी दवाखान्यात दाखल केले. मात्र, त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे येथील डॉक्टरांनी घोषित केले.
दरम्यान, ओंकारने दारूच्या नशेत आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मात्र ओंकार सावंत याने आत्महत्या का केली? याचे खरे कारण अद्याप समोर आले नाही. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करत आहे.