बारामती : महिलेच्या घरात घुसून तिच्यासह तिच्या मुलीला जातिवाचक शिवीगाळ करत अल्पवयीन मुलीच्या अंगावरील कपडे ओढत तिचा विनयभंग करणाऱ्यावर पोक्सोसह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. अभिजित आनंदकुमार शहा (रा. जुना मोरगाव रस्ता, बारामती) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे.
पीडित मुलीच्या आईने यासंबंधी फिर्याद दाखल केली. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, अभिजित उर्फ अजय शहा याच्याशी फिर्यादी महिलेची ओळख होती. ते दोघे एकत्र राहत होते. परंतु, त्यांची एकमेकांशी सतत भांडणे होत होती. या महिलेने शहा याच्या विरोधात २०२३ मध्ये बलात्कारासहअॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला होता. सध्या तो न्यायप्रविष्ठ आहे.
त्यानंतर २२ जानेवारी रोजी या महिलेने दुसरी फिर्याद दाखल केली. त्यात अल्पवयीन मुलीशी शहा याने ११ ऑक्टोबर २०२४ रोजी गैरवर्तन केल्याचे म्हटले आहे. ही महिला व तिची मुलगी घरी असताना रात्री साडेदहाला दरवाजा जोरात ठोठावण्यात आला. तिने दरवाजा उघडला असता अभिजित हा दारू पिऊन घरात आला. त्याने या दोघींना जातिवाचक शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. मुलीच्या अंगातील टीशर्ट ओढत तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याचे तिने फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, गेले तीन महिने पोलिसांनी माझी फिर्याद दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली असल्याचे या महिलेने सांगितले. उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड अधिक तपास करत आहेत.