मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत आठ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. काही दिवसापूर्वी राज्यात अवकाळी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्याचे उभे पीक आडवे झाले आहे. यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच झोपडीधारकांना दिलासा मिळेल असाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.
दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसासह गारपिट झाल्याने हातातोंडाशी आलेलं पिक शेतकऱ्यांच्या हातून गेलं आहे. परिणामी शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांना या आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी अवकाळीग्रस्त भागांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुमारे १ लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसून ३ हेक्टरपर्यंत नुकसानभरपाई देण्यात येईल, यासाठी महसूल, कृषी विभागाने तातडीने कालबध्दरितीने एकत्रितरित्या सर्व जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण करावेत असे निर्देश आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत दिले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील यासंदर्भात प्रशासनाने युद्ध स्तरावर काम करावे अशा सूचना दिल्या.
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय पुढीलप्रमाणे
- अवकाळीग्रस्त भागांचे एकत्रित पंचनामे तातडीने सादर करणार. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणार.
- झोपडपट्टी पुनर्वसनमधील सदनिका हस्तांतरण शुल्कात ५० टक्के कपात.
- राज्यात ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान तसेच शाळांचे मूल्यांकन करणार. पहिल्या टप्प्यात ४७८ शाळा.
- मराठी भाषा भवनाची उभारणी वेगाने करणार.
- मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळासाठी शासन हमी वाढविली.
- औद्योगिक व कामगार न्यायालयाच्या न्यायाधीशांना सुधारित सेवानिवृत्तीवेतन.
- ‘महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना – २०२३’ राबवून महसुली उत्पन्नात मोठी वाढ करणार.
- शेती महामंडळाच्या खंडकरी शेतकऱ्यांना भोगवटा वर्ग १ जमिनीसाठी अधिनियमात सुधारणा.