लोणी काळभोर, (पुणे) : आज सर्वत्र वेगवेगळे सप्ताह साजरे होतात त्याचप्रमाणे गावोगावी ‘संविधान साक्षरता सप्ताह’ सुरू होण्याची गरज आहे. प्रत्येक नागरिकाला आपल्या देशाच्या राज्यघटनेची माहिती असायला हवी असे मत कदमवाकवस्तीच्या पोलीस पाटील प्रियांका भिसे यांनी केले. लोणी काळभोर (ता. हवेली) येथील विश्वरत्न फौडेशन या सेवाभावी संस्थेच्या वतीने संविधान गौरव दिनाचे औचित्य साधून कन्या प्रशाला, पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये संविधानाचे वाटप करण्यात आले. यावेळी भिसे बोलत होत्या.
यावेळी विश्वरत्न फौडेशनचे अध्यक्ष विजय ननवरे, सदस्य ॲड. श्रीकांत भिसे, कालिदास काळभोर, हवेली तालुका पत्रकार संघाचे सल्लागार तुळशीराम घुसाळकर, पत्रकार विजय काळभोर, पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य सिताराम गवळी, कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापक निशा झिंजुरके, शिक्षक सुधाकर ओहोळ आदी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
यापुढे बोलताना भिसे म्हणाल्या, “एक सजग नागरिक म्हणून जगत असताना आपली राज्यघटना आणि त्याचे महत्त्व समजून घेणे हे आपले प्राथमिक कर्तव्य आहे. राज्यघटना सर्वोच्च कायदा आहे; परंतु तो केवळ कायदा नसून ते भारतीय तत्त्वज्ञान आहे. भारतीय राज्यघटनेचा केंद्रबिंदू सामान्य माणूस आहे. ‘संविधान साक्षरता ही काळाची गरज आहे. शिक्षकांनी हे संविधान वाचून विद्यार्थ्यांपर्यंत भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांबरोबरच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली प्रज्ञा, शील, करुणा व मैत्री ही मूल्येदेखील पोहोचवावीत.”
दरम्यान, विद्यार्थ्यांनी संविधानाचे महत्व आपले मनोगतून व्यक्त केले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी संविधानाची शपथ घेतली. याप्रसंगी २६\११ मधील अतिरेकी हल्ल्यात शहिद झालेल्या शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कल्पना बोरकर यांनी केले. तर आभार संजीवनी बोरकर यांनी मानले.