वाघोली : वाघोली परिसरातील भावडी रोड येथील अवैध दारू भट्टीवर गुन्हे शाखा युनिट 6 च्या पथकाने छापा टाकून एकाला ताब्यात घेतले आहे. या छाप्यात पोलिसांनी दारू तयार करण्याचे 2 लाख 01 हजार रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. शुक्रवारी (ता. 25) ही कारवाई करण्यात आली आहे.
रोहन संजय राजपूत (वय 25 रा. बोरकरवस्ती भावडी, वाघोली पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस हवालदार. रमेश मेमाणे, पो.अ. ऋषिकेश ताकवणे, सचिन पवार, नितीन धाडगे हे परिसरात गस्त घालत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की,एका इसमाकडून बेकायदेशीररीत्या गावठी दारू तयार करून विक्री केली जात आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी तातडीने बोरकर वस्ती येथे छापा टाकला.
छाप्यादरम्यान रोहन राजपूत हा इसम गावठी दारू तयार करताना आढळून आला. त्यास ताब्यात घेऊन वाघोली पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.येथे पहा व्हिडिओ
या कारवाई दरम्यान पोलिसांनी 1 लाख 82 हजार रुपयांचे 5 हजार 200 लिटर कच्चे रसायन, तयार गावठी दारू व इतर साहित्य व सरपण असा एकूण 2 लाख ,01 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.या प्रकरणी वाघोली पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 146/2025 अन्वये महाराष्ट्र प्रोव्हिबिशन ऍक्टच्या कलम 65 (ई), (फ), (क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस उपआयुक्त गुन्हे निखिल पिंगळे सहा.पोलीस आयुक्त सो गुन्हे-2, राजेंद्र मुळीक या वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, पोलीस उप निरीक्षक रामकृष्ण दळवी, रमेश मेमाणे, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, नितीन धाडगे, प्रतिक्षा पानसरे, कीर्ती मांदळे यांचे पथकाने केलेली आहे.