शिरूर : कोळगाव डोळस (ता.शिरूर) येथील परिसरातील गट नंबर ११७ मध्ये अज्ञात चोरट्यांनी शासनाची कोणतीही परवानगी न घेता सुमारे चौदा लाख सतरा हजार रुपयांच्या काळ्या मातीची चोरी केल्याचे उघड झाले आहे.त्यामुळे अज्ञात व्यक्तीच्या विरोधात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी हर्षद बाळासाहेब साबळे(वय २९,रा.बाबुराव नगर, शिरूर,मूळ रा.पारगाव सुद्रिक,ता. श्रीगोंदा,जि.अहमदनगर)या तलाठ्याने शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, फिर्यादीमध्ये १६८७ ब्रास काळी माती जेसीबी व हायवा यांच्या सहाय्याने चोरून नेली असल्याचे नमूद केले आहे.
या घटनेबाबत शिरूर पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार कोळगाव डोळस येथील परिसरात १ एप्रिल ते ५ एप्रिल या कालावधीमध्ये गट नंबर ११७ मध्ये एका अज्ञात व्यक्तीने आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीररित्या जेसीबी आणि हायवा वाहनांचा वापर करून गौण खनिजाचे(काळी माती)उत्खनन केले.संबंधित उत्खनन शासनाची कोणतीही परवानगी न घेता करण्यात आले.त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला आहे.
घटनेचा पुढील तपास शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस करीत आहेत.
शिरूर तालुक्यात खंडाळा माथा येथे व दहिवडी परिसरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ब्लास्टिंग करून डोंगर फोडण्याचे काम सुरू आहे. याकडे मात्र महसूल विभागाने मुद्दाम दुर्लक्ष केले असल्याचे बोलले जात आहे.