पुणे : मराठा समाजाबाबत अपशब्द वापरल्याप्रकरणी जळगावमधील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना निलंबित करण्यात आले आहे. मराठा समाजाचा वाढता प्रक्षोभ लक्षात घेत बकाले याला तडकाफडकी निलंबित करण्यात आलं आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी शेखर यांनी हे निलंबनाच्या आदेश पारित केले आहेत.
पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले याने मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या प्रकरणावरून बकाले याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी मराठा समाजातील विविध संघटना आक्रमक झाल्या होत्या. त्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेत बकाले याची तत्काळ बदली करण्यात आली होती. तसंच दुसऱ्या दिवशी बकाले याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले हे १ नोव्हेंबर २०२० पासून जळगावमधील स्थानिक गुन्हे शाखेत कार्यकरत आहेत. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील नेमणुकीत असलेल्या एका पोलीस अंमलदारासोबत विशिष्ट समाजाबाबत अत्यंत आक्षेपार्ह, घृणास्पद, निंदनीय आणि विशिष्ट समाजाच्या भावना भडकवणारे संभाषण केल्याची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. त्यांनी पोलीस निरीक्षक दर्जाच्या महत्त्वाच्या व जबाबदारीच्या पदावर कार्यरत असताना, उच्च नैतिक मुल्यं बाळगून, लोकांप्रती सौजन्य आणि सद्वर्तन ठेवणे अपेक्षीत होते. असं असतानाही त्यांनी विशिष्ट समाजाबद्दल अत्यंत खालच्या दर्जाच्या भाषेचा वापरक केला आहे.
व्हायरल ऑडीओ क्लीपमधील संभाषणामुळे विशिष्ट समाजात चुकीचा संदेश जाऊन पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाली आहे. त्यांच्या या अत्यंत बेशिस्त आणि बेजबाबदारपणाच्या गैरवर्तनामुळे मोठ्या प्रमाणात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रस्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे,” असं नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ, बी. जी. शेखर पाटील यांनी जळगावचे पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे आणि सहाय्यक पोलीस अधीक्षकांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.