हडपसर, (पुणे) : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पुणे बाजूकडे जाणाऱ्या लेनवर खाजगी बस बंद पडलेल्या ट्रकला मागून धडकून झालेल्या अपघातात पोलीस शिपायासह चार जणांचा मृत्यू झाला.
पुणे शहर पोलीस दलामध्ये सायबर सेल मध्ये कार्यरत असलेले नितीन दिलीप शिंदे (वय-३६ रा. हडपसर पुणे), आरती बिराजदार (वय २५ राहणार पुणे), अमित कलशेट्टी (वय २० राहणार सोलापूर), गणपत पाटील (वय ५५ वर्ष राहणार कात्रज पुणे) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस नाईक शिंदे हे सोलापूरहून पुण्याकडे घरी निघाले होते. शिंदे हे पुणे शहर पोलीस दलातील कोंढवा, हडपसर, गुन्हे शाखा युनिट ६ अशा विविध पोलीस ठाण्यात उल्लखनीय कामगिरी केली होती. तसेच सध्या पोलीस आयुक्तालयात कर्तव्य बजावत होते. पोलीस ठाण्यात पोलीस नाईक या पदावर कार्यरत होते. ते एक उत्कृष्ट खेळाडू होते. ॲथलेटिक्स प्रकारात ते उत्कृष्ट रनर होते.
पुणे शहर पोलीस स्टेशनला कार्यरत असताना विविध गुन्ह्यातील त्यांचा आरोपी पकडण्यात त्यांचा मोठा सहभाग होता. हडपसर पोलीस स्टेशन मध्येही त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. नितीन शिंदे यांच्या अचानक जाण्याने पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. एक उमदा व चांगला सहकारी अपघाती निधनात गेल्याची दुःखद भावना हडपसर पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, शिंदे हे कुटुंबातील कर्ते होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी व मुली संस्कृती (वय-१३) व गिरीजा (वय-११) असा परिवार आहे. नितीन शिंदे यांच्या जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, कुटुंबियांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा आहे.