पुणे : पावसाने निरोप घेतल्यानंतर राज्यात सर्वीकडे आता थंडीची चाहूल लागायला सुरवात झाली आहे. दिवाळीनंतर राज्यात तापमानात चढउतार पाहायला मिळत असून काही ठिकाणी हवेत गारवा वाढल्याचे दिसत आहे. खास करून पहाटे हवेतील गारठा वाढल्याचं चित्र आहे. उत्तर महाराष्ट्रात खासकरुन थंडी मोठ्या प्रमाणात असल्याचं समोर आलं आहे. कोकणात आणि मुंबईमध्ये अद्याप गुलाबी थंडीची प्रतीक्षाच आहे. राज्याच्या तापमानात चढ उतार दिसत आहे.
उत्तर महाराष्ट्रात हवेत मोठ्या प्रमाणात गारठा जाणवू लागला आहे. हळू हळू राज्यभरात थंडी पसरेल. सध्या धुळे, नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील किमान तापमानाचा पारा १६ अंशाच्या खाली आला आहे. उर्वरित राज्यात अद्याप थंडीची प्रतीक्षा कायम आहे. पुढील आठवडाभर राज्यात तापमानात चढ-उतार पाहायला मिळू शकते. १५ तारखेनंतर राज्यात थंडी पसरण्यास सुरुवात होईल, तर महिनाअखेर राज्यात थंडी सर्वदूर पसरलेली असेल.
पुण्यात दिवसा उन्हाचे चटके, रात्री हवेत गारठा..
बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यामुळे कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम राहू शकतो. राज्यात थंडीची प्रतीक्षा असतानाच कोकणात आणि मुंबईत मात्र उन्हाचे चटके जाणवत आहे. सांताक्रृझमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. त्याशिवाय सोलापूर, पुण्यातही चटके जाणवत आहे. पुणे घाटमाथ्यावर दुपारी उन्हाचे चटके आणि रात्री हवेत गारठा जाणवत आहे.
मध्य महाराष्ट्रात पहाटेवेळी गारठा वाढला आहे. राज्यात कमाल-किमान तापमानातील तफावत कायम आहे. राज्याच्या किमान तापमानात घट होत असली तरी थंडीची प्रतीक्षा आहे. मुंबईसह उपनगरात हवेची गुणवत्ता खालावली आहे. दिवाळीनंतर हेवतील प्रदुषण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.