पुणे प्राईम न्यूज डेस्क : संपूर्ण भारतात सध्या सायबर चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. या सायबर चोरट्यांपासून वाचण्यासाठी सरकारने देशातील मोबाईल फोन युजर्सना एक इशारा दिला आहे. दूरसंचार विभागाने युजर्सना काही कॉलपासून सावध राहण्यास सांगितले आहे. यामध्ये ‘स्टार 401 हॅशटॅग’ (*401#) डायल करून सायबर चोरटे युजरच्या मोबाईल नंबरवर कॉल करून ओटीपी मागतात. हा ओटीपी मिळाला की सायबर चोरट्यांना युजर्सचे सर्व कॉल फॉरवर्ड करण्याची परवानगी मिळते. त्यानंतर नंतर सर्व डिटेल्स मिळवून बँक खाते रिकामे करतात. त्यामुळे सर्व मोबाईल वापरकर्त्यांना सतर्क राहण्याचा सल्ला सायबर एक्सपर्ट देत आहेत.
चुकूनही *401# डायल करू नका
दूरसंचार विभागाने Airtel, Jio, Vodafone-Idea, BSNL च्या सर्व युजर्सना अशा इनकमिंग कॉल्सपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. या आधीही गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये *401# कॉल फॉरवर्डिंग स्कॅमची प्रकरणे समोर आली आहेत. हे गुन्हेगार ऑनलाइन डिलिव्हरी, बँक किंवा इतर सेवांचे एजंट म्हणून सांगतात आणि युजर्सना या नंबरवर कॉल करण्यास सांगतात. युजर्स स्कॅमर्सच्या सापळ्यात अडकतात आणि हा विशेष युएसएसडी कोड टाकून, ते सायबर गुन्हेगारांनी दिलेल्या अनोळखी नंबरवर त्यांच्या फोनवरील सर्व इनकमिंग कॉल्सना परवानगी देतात.
बँकिंग एजंट किंवा टेलिकॉम ऑपरेटर सपोर्ट असल्याची बतावणी करत सायबर गुन्हेगार युजर्सला कॉल करतात. त्यानंतर नेटवर्क समस्या किंवा इतर कोणत्याही समस्येचे निराकरण करण्यासाठी हा नंबर डायल करण्यास सांगतात. दूरसंचार विभागाने युजर्सना अशा कोणत्याही सर्व्हिस कॉलकडे दुर्लक्ष करण्यास आणि कॉल फॉरवर्डिंग केलेले नंबर वापरू नये, असे सांगितले आहे.
असे थांबवा कॉल फॉरवर्डिंग!
1) जर युजर्स सायबर गुन्हेगारांना बळी पडले असतील आणि फोनमध्ये कॉल फॉरवर्डिंग सुरु झाले, तर त्यांना स्मार्टफोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन ते फॉरवर्डिंग कॉल त्वरित बंद करावे.
2) यासाठी यूजर्सला प्रथम फोनच्या सेटिंगमध्ये जावे लागेल.
3) यानंतर, युजर्स कॉल सेटिंग्जमध्ये जाऊन कॉल फॉरवर्डिंग पर्यायवर क्लिककरून ते डिसेबल करू शकतात किंवा डीफॉल्ट सेटिंग्ज करू शकता.