चंद्रपूर : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण ताजच असताना आता चंद्रपुरमधूनही अशीच घटना समोर आली आहे. चंद्रपूरमध्ये शिक्षकाने विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. गुंगीच्या गोळ्या देऊन या विद्यार्थिनीवर शिक्षकाने लैंगिक अत्याचार केला आहे. या घटनेमुळे चंद्रपूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आरोपी शिक्षक हा काँग्रेसचा पदाधिकारी असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना येथील एका प्रसिद्ध शाळेत शिकणाऱ्या ११ वर्षांच्या मुलीवर शिक्षकाने लैंगिक अत्याचार केले. यासंबंधीची तक्रार पीडीतेने कोरपना पोलिसात केली असून शिक्षकाविरोधात पॉक्सो आणि लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार शिक्षकाला आज पहाटे अकोल्यामधून अटक करण्यात आली आहे.
ही घटना मे महिन्यात घडली असून याबाबत तक्रार मंगळवारी दाखल करण्यात आली आहे. पीडित मुलगी एक्स्ट्रा क्लास करण्यासाठी उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये शाळेत जात होती. इतरही विद्यार्थी या वर्गाला यायचे. आरोपी शिक्षक अमीत लोडे हा वर्ग घेत असे. एक दिवस त्याने पीडित मुलीला कार्यालयात बोलावून तिला गुंगीच्या गोळ्या दिल्या आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
मुलगी शुद्धीवर आल्यावर तिने घडलेला सर्व प्रकार घरी सांगू नये म्हणून त्याने तिला धमकावले सुद्धा होते. त्यामुळे ही मुलगी गप्प राहिली. पण पीडित मुलीने हा प्रकार वर्गातील मैत्रिणीला सांगितला होता. या मैत्रिणीने तिच्या आईला हा प्रकार आता सांगितल्यावर पीडितेच्या आईने मंगळवारी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यावरून आरोपी शिक्षकाविरोधात पॉक्सो आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसामध्ये तक्रार झाल्यानंतर हा शिक्षक फरार झाला होता.परंतु, आज पहाटे त्याला अकोला येथून अटक करण्यात आली आहे.