अहमदनगर : पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार अध्यक्ष शरद पवार यांची पुणे पक्ष कार्यालयात भेट घेत पक्षात प्रवेश केला. यावेळी बोलताना ते म्हणाले कि, पवार साहेबांची अदृश्य ताकद माझ्यासोबत होती. मी साहेबांना कधीही सोडून गेलेलो नव्हतोच, असं वक्तव्य निलेश लंके यांनी केलं आहे.
त्यामुळे अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. अशातच आता निलेश लंकेंच्या स्वागताच्या बॅनरनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. “वस्तादाचा पहिला डाव” असा उल्लेख या बॅनरवर करण्यात आला आहे. त्यामुळे या बॅनरची आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
दरम्यान, आज आमदार निलेश लंके हे आपल्या कार्यकर्त्यांसह तुळजापूरला तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जात आहेत. यावेळी रस्त्यात त्यांचे ठिकठिकाणी स्वागत होताना दिसत आहे. रुईछत्तीशी गावात त्यांचे डीजेच्या तालात स्वागत करण्यात आलं. तसेच रुईछत्तीशी गावात निलेश लंके यांच्या स्वागताचा एक बॅनर लावण्यात आला. जो सर्वांचे लक्ष वेधत आहे. या बॅनरवर शरद पवार यांचा फोटो, तुतारी चिन्ह, आ. निलेश लंके, त्यांची पत्नी राणी लंके यांचा एकत्रित फोटो पाहायला मिळत आहे.
“वस्तादाचा पहिला डाव”, निलेश लंकेंच्या बॅनरनं वेधलं सर्वांचं लक्ष
तसेच या बॅनरवर “वस्तादाचा पहिला डाव” असा उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान याबाबत निलेश लंके यांना विचारले असता “आगे -आगे देखील होता है क्या?” असं फडणवीस स्टाईलमध्ये सूचक वक्तव्य निलेश लंके यांनी केलं आहे. तसेच निलेश लंके यांच्या ताफ्यातील वाहनांवर तुतारीचे चिन्ह लावण्यात आले आहे. निलेश लंके यांनी लोकसभा लढवावी म्हणून तुळजाभवानीजवळ कार्यकर्ते साकडे घालणार आहे.