धाराशिव : धाराशिवचे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारादरम्यान आमदार कैलास पाटील यांना चक्कर आल्याची घटना समोर आली आहे. प्रचार रॅलीदरम्यान त्यांना उष्माघाताचा त्रास झाला आणि ते अचानक चक्कर येऊन खाली पडले. तात्काळ त्यांना जवळच्या रुग्णालयामध्ये नेण्यात आलं आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून उपचार सुरू आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धुम सुरु आहे. ऐन उन्हाळ्यात निवडणुका आल्याने उमेदवारांची चांगलीच दमछाक होत आहे. भर उन्हात नेत्यांच्या सभा बैठका आणि रॅलींचा धडाका सुरू आहे. अशातच धाराशीव लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आज मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल् केला.
यावेळी त्यांनी रॅलीचे आयोजन केलं होतं. या रॅलीमध्ये आमदार कैलास पाटील यांना अचानक चक्कर आली आणि ते खाली पडले. यावेळी स्थानिक कार्यकर्त्यांनी आमदार कैलास पाटील यांना तातडीने नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.