नांदेड: नांदेड जिल्ह्यात जागेच्या वादावरून महिला सरपंचासह त्यांच्या पतीला चार ते पाच जणांकडून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. चार ते पाच जणांकडून ही मारहाण करण्यात आली. मारहाणीचा व्हिडिओ शूट करून तो व्हायरलही करण्यात आला आहे. ही धक्कादायक घटना नांदेडच्या इंजेगाव येथे घडली असून, या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील इंजेगाव येथे नागनाथ नारायण पंचलिंगे यांच्या आईच्या नावावर शेत जमीन आहे. ही शेत जमीन दुसऱ्याच्या नावाने फेरफार लावल्याचा आरोप नागनाथ पंचलिंगे यांनी केला आहे. याबाबत नागनाथ पंचलिंगे यांनी न्यायालयात देखील अर्ज दाखल केला होता. त्यानंतर हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना काही लोकांनी त्या जमिनीवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला.
नागनाथ पंचलिंगे आणि त्यांची पत्नी महिला सरपंच या शेतात गेल्या होत्या. तेंव्हा त्यांच्यावर चार ते पाच जणांनी मिळून प्राणघातक हल्ला करून मारहाण केली. त्यांनी या मारहाणीचा व्हिडिओ शूट करून व्हायरलही केला.
या प्रकरणी पंचलिंगे यांनी मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांविरोधात खोटा फेरफार केल्याची अनेक वेळा तहसीलदारांकडे कारवाईची मागणी केली होती, मात्र त्या मागण्यांकडे तहसीलदाराने दुर्लक्ष केले असा आरोप नागनाथ पंचलिंगे यांनी केला आहे.
दरम्यान, या मारहाणीच्या घटनेनंतर ग्रामीण पोलीस ठाण्यात संबंधितांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.