पुणे : पावसाळी वातावरण आणि ढगाळ हवामानामुळे ऑक्टोबर हीटचा चटका काहीसा कमी झाल्याने कमाल तापमानाचा पारा घसरला आहे. अशातच अंदमानच्या सागरातून उठलेले ‘दाना’ हे चक्रीवादळ बंगालच्या खाडीच्या दिशेने वेगाने सरकत आहे. त्यामुळे आज राज्यातील काही जिल्ह्यांत वादळी पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तवली आहे.
आज कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तर उद्या तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मेघगर्जना, विजेचा कडकडाट आणि वादळी वा-यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना व विजांच्या कडकडाटात आणि वादळी वा-यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यानुसार, हवामान खात्याने या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.
दाना चक्रीवादळाचा प्रवास ईशान्य दिशेने होत आहे. तर या चक्रीवादळाचे रुपांतर तीव्र चक्रीवादळात होणार आहे. हे चक्रीवादळ उत्तर ओडिशा आणि पश्चिम बंगालची किनारपट्टी पुरी आणि सागर बेटाच्या दरम्यान ओडिशातील भितारकणिका आणि धमारा येथे आज आणि उद्या सकाळी पार करण्याची शक्यता आहे. यावेळी 100 ते 110 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे.