सातारा : देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या ट्रॅव्हल्सचा साताऱ्यात मध्यरात्री भीषण अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे.सातारा जिल्ह्यातील लोणंद-सातारा मुख्य रस्त्यावर हा अपघात झाला असून या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री सालपे गावाजवळ मिनी ट्रॅव्हल्स आणि ट्रक यांच्यात समोरासमोर जोरदार धडक होऊन तीन जण ठार झाले असून आठ जण जखमी झाले आहेत. उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या इचलकरंजी येथील भाविकांच्या ट्रॅव्हल्सला अपघात झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या अपघातात मिनी ट्रॅव्हल्स आणि त्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर ट्रॅव्हल्स चालक आणि एक महिला जागीच ठार झाले तर अन्य एक महिला गंभीर जखमी झाली असून तिचा सातारा सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
दरम्यान या अपघातात मृत ट्रॅव्हल्स चालक सलमान इम्तियाज सय्यद (वय 24), आणि रजनी संजय दुर्गुळे (वय 48 रा.पेठ वडगाव तालुका हातकलंगले )अशी त्यांची नावे आहेत. या अपघाताच्या घटनेची नोंद करण्याचे काम लोणंद पोलीस स्टेशनमध्ये सुरू होते .पुढील तपास सातारा पोलिस सुशील भोसले करीत आहेत.