मुंबई: T20 विश्वचषक 2024 च्या अ गटातील सामन्यात अमेरिकेने 2009 च्या चॅम्पियन पाकिस्तानला सुपर ओव्हरमध्ये पराभूत करून इतिहास रचला. हा सामना टेक्सासमधील ग्रँड प्रेरी स्टेडियमवर खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 20 षटकांत सात गडी गमावून 159 धावा केल्या होत्या. कर्णधार बाबर आझमने सर्वाधिक 44 धावा केल्या. प्रत्युत्तरात अमेरिकेच्या संघाला 20 षटकांत तीन गडी गमावून 159 धावा करता आल्या. कर्णधार मोनांक पटेलने सर्वाधिक 50 धावा केल्या. शेवटी सामना सुपर ओव्हरमध्ये पोहोचला. सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या अमेरिकेने 18 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ सहा चेंडूत केवळ 13 धावा करू शकला.
सुपरओव्हरमध्ये काय घडले?
मोहम्मद आमिरने सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानसाठी गोलंदाजी करत अनेक अतिरिक्त धावा दिल्या. त्याचवेळी सौरभ नेत्रावलकर अमेरिकेसाठी गोलंदाजी करण्यासाठी आला आणि त्याने पाकिस्तानला केवळ 13 धावाच करू दिल्या. तसेच इफ्तिखार अहमदलाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले. हा सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला. डावखुरा वेगवान गोलंदाज सौरभने सुपर ओव्हरपूर्वी आपल्या चार षटकांच्या चांगली गोलंदाजी केली होती. त्याने चार षटकात केवळ 18 धावा दिल्या आणि दोन बळीही घेतले. तो अमेरिकेसाठी सामना जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली. मात्र, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, सौरभ भारताकडून अंडर-19 विश्वचषकही खेळला आहे. तथापि, चांगल्या संधींसाठी तो अमेरिकेत गेला. जाणून घेऊया त्याची कहाणी…
मुंबईकर सौरभ नेत्रवाळकर कोण?
सौरभचा जन्म16 ऑक्टोबर 1991 रोजी मुंबईत झाला. सौरभ नेत्रवाळकर हा भारतीय वंशाचा अमेरिकन क्रिकेटर आहे. तो अमेरिकेच्या राष्ट्रीय संघाचा कॅप्टन देखील होता. अमेरिकेत जाण्यापूर्वी सौरभ नेत्रवाळकर भारतात भरपूर क्रिकेट खेळला आहे. भारताकडून अंडर 19 टीममधून खेळलेला नेत्रवाळकर 2015 साली अमेरिकेत स्थायिक झाला. नेत्रवाळकर मुंबईकडून तो रणजी ट्रॉफी खेळला आहे. तसेच केएल राहुल, मयंक अग्रवाल, हर्षल पटेल, जयदेव उनाडकट आणि संदीप शर्मा यांच्यासोबत क्रिकेट देखील तो खेळला आहे.
सौरभ नेत्रावळकरची क्रिकेट कारकीर्द
सौरभच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने आत्तापर्यंत अमेरिकेसाठी 48 एकदिवसीय आणि 29 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 78 आणि टी-20मध्ये 29 विकेट्स आहेत. एकदिवसीय सामन्यामध्ये त्याची सर्वोत्तम गोलंदाजी 32 धावांत पाच विकेट आहे, तर टी-20 मध्ये 12 धावांत पाच विकेट ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी आहे. त्याच्या नावावर एक प्रथम श्रेणी सामना आहे, ज्यामध्ये त्याने तीन विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर त्याने 80 लिस्ट-ए सामन्यांमध्ये 117 विकेट घेतल्या आहेत. एकूण लीग आणि आंतरराष्ट्रीय T20 यासह त्याच्या नावावर 29 सामने आहेत, ज्यात त्याने 29 विकेट घेतल्या आहेत.
मुंबई ते अमेरिकेचा प्रवास
2013 मध्ये मुंबईसाठी सौरभ नेत्रावळकरने पदार्पण केले होते. परंतु, त्याला जास्त सामने खेळायला मिळाले नाहीत. त्यानंतर मास्टर्ससाठी स्कॉलरशिप मिळाल्यावर सौरभने अमेरिका गाठली. अमेरिकेत जाऊन त्याने सॉफ्टवेअर इंजिनिअरचे शिक्षण घेतले आणि नंतर तिथेच स्थायिक होऊन नोकरी करायला लागला. सौरभ नेत्रावळकर हा व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असल्याने त्याने स्वतःचे क्रिकेट ॲप देखील तयार केले आहेतर. सौरभ सध्या ओरॅकलमध्ये टेक्निकल टीमचा प्रमुख सदस्य आहे. क्रिकेट खेळण्यासोबतच तो नोकरीही करतो.
सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टनुसार, सौरभ नेत्रावळकरने टी-20 वर्ल्डकपसाठी आपल्या नोकरीतून 17 जूनपर्यंत सुट्टी घेतली आहे. परंतु, अमेरिकेची कामगिरी बघता संघ सुपर 8 मध्ये दाखल होण्याची शक्यता नाकारू शकत नाही. त्यामुळे कदाचित नेत्रावळकरला पुन्हा त्याची सुट्टी वाढवावी लागेल असे दिसते.