पुणे : ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकापूर्वी टीम इंडिया मंगळवारपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल पाहायला मिळू शकतात. हा सामना संध्याकाळी ७.३० वाजल्यापासून सध्याच्या टी-२० विश्वचषक विजेता ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध होणार आहे.
भारतीय संघाच्या अंतिम अकरात पहिल्या चारमध्ये रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांचा समावेश आहे. हार्दिक पांड्या त्याच्या अष्टपैलू क्षमतेमुळे निश्चित खेळणार आहे. यष्टिरक्षक म्हणून कोण खेळणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आशिया चषकादरम्यान, कार्तिकने भारताचा पहिला-पसंतीचा यष्टिरक्षक म्हणून सुरुवात केली, परंतु अष्टपैलू जडेजाच्या दुखापतीमुळे रोहितने डावखुरा ॠषभ पंतला संधी दिली. शेवटच्या षटकात मोठे फटके मारण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या कार्तिकपेक्षा पंतला पहिले प्राधान्य मिळू शकते. जखमी जडेजाच्या जागी अक्षर पटेलला संधी मिळाली.
भारतीय संघाच्या गोलंदाजी ताफ्यात जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल यांच्या पुनरागमनामुळे ती अधिक मजबूत झाली आहे. बुमराह आणि हर्षल दोघेही दुखापतींमुळे २०२२ च्या आशिया चषकाला मुकले. आता तीन सामन्यांच्या टी२० मालिकेदरम्यान ठसा उमटवण्याचा ते प्रयत्न करतील. मोहम्मद शमीच्या जागी संघात आलेल्या उमेश यादवलाही भारतीय संघ संधी देऊ शकते. अक्षर व्यतिरिक्त युझवेंद्र चहल आणि आर. अश्विनसारखे फिरकीचे पर्याय आहेत. शेवटी कर्णधार रोहित आणि प्रशिक्षक राहुल द्रविड काय विचार करतात यावर सारं काही अवलंबून असेल.
सामना कोठे पहायला मिळणार
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २० सप्टेंबरला मोहालीतील पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या IS बिंद्रा क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७. ३० वाजता खेळला जाणार आहे. आशिया कपच्या प्रसारणाचे अधिकार स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत. तुम्ही हा सामना स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स ३, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट एचडी वर पाहू शकता. हा सामना डीडी स्पोर्ट्स चॅनलवर डीडी फ्री डिशवर प्रसारित केला जात आहे. डीडी स्पोर्ट्स चॅनलसाठी कोणतेही शुल्क नाही. अशा परिस्थितीत तुम्ही कोणतेही पैसे न भरता हा सामना पाहू शकता.