मुंबई : भारत-पाकिस्तानच्या सामन्यासाठीची तिकीट विक्री सुरू होताच, चाहत्यांच्या त्यावर उड्या पडल्या आहेत. तिकिटांची वाढती मागणी बघता काळाबाजर तेजीत सुरू झाला आहे.
आशिया चषक स्पर्धा येत्या २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने येणार आहेत. दोन्ही देशांदरम्यान २८ ऑगस्ट रोजी सामना रंगेल. त्यामुळे क्रिकेटच्या मैदानावर भारत-पाकिस्तान संघर्ष बघणे, ही क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी असते.
याचाच फायदा घेऊन काही चाहत्यांनी तिकिटांची पुनर्विक्री करून काळाबाजार सुरू केला आहे. भारत-पाक लढतीची चाहते दुप्पट-तिप्पट किंमतीला तिकीटे विकत असल्याचे निदर्शनास आले आहे.
यूएईमधील सर्वात लोकप्रिय वेबसाइटपैकी एक असलेल्या ‘प्लॅटिनमलिस्ट डॉट नेट’ याठिकाणी अधिकृत तिकीट विक्री सुरू आहे. प्लॅटिनम लिस्टने म्हटले आहे की, ‘सरकारी नियमांनुसार तिकीटांची पुनर्विक्री बेकायदेशीर आहे. अशी तिकीटे आढळल्यास ती आपोआप रद्द होतील.
दरम्यान, भारत-पाकिस्तान लढतीच्या तिकिटांचा काळाबाजार सुरू असल्याचे लक्षात येताच, अधिकाऱ्यांनी कारवाईचा इशारा दिला आहे.