पुणे: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग अखेर सर्वोच्च न्यायालयाने मोकळा केला असून, पुढील चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे राज्यभरातील राजकीय घडामोडींना गती मिळाली आहे. मात्र, पुणे महानगरपालिकेसाठी कोणती प्रभाग रचना लागू होणार, याबाबत अजूनही संभ्रम कायम आहे. राज्य सरकारकडून पुणे महापालिकेसाठी नवीन प्रभाग रचना लागू करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. तर पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी मात्र २०१७ ची जुनी प्रभाग रचना कायम ठेवली जाणार असल्याची चर्चा आहे. प्रशासनाकडून अद्याप अधिकृत घोषणा झाली नसल्याने ६ किंवा ७ जूनपर्यंत निर्णय अपेक्षित आहे, अशी माहिती महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

राजकीय वर्तुळात सर्वात मोठा प्रश्न म्हणजे पुण्यात चार सदस्यीय प्रभाग पद्धत लागू होणार की तीन सदस्यीय? राज्य सरकारने २०१७ मध्ये अमलात आणलेल्या चार सदस्यीय प्रभाग रचनेप्रमाणेच आगामी निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत अनेक महापालिकांमध्ये दोन सदस्यीय प्रभाग लागू करण्यात आले होते. आता एकसमानता राखण्यासाठी पुन्हा चार सदस्यीय प्रणाली स्वीकारली जात आहे. या निर्णयानुसार पुणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली आणि नव्याने महापालिका दर्जा मिळालेल्या शहरांमध्ये नवीन प्रभाग रचना तयार केली जाईल, तर पिंपरी-चिंचवडसह इतर १७ महानगरपालिकांमध्ये २०१७ ची प्रभाग रचना कायम राहणार आहे. मुंबई महापालिकेसाठी मात्र स्वतंत्र एक-सदस्यीय प्रभाग रचना लागू केली जाणार आहे.

या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर प्रमुख राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. इच्छुक उमेदवार देखील मागील साडेचार वर्षांपासून सतत मतदारसंघात कार्यक्रम घेत, जनतेशी संपर्क ठेवीत आहेत. नागरिकांवर प्रभाव टाकण्यासाठी प्रचारपूर्व कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि देणग्यांचे नियोजन करण्यात येत आहे. माजी नगरसेवक मात्र सध्या शांत असून, निवडणूक जाहीर होण्याच्या प्रतिक्षेत आहेत. निवडणुका घोषित झाल्यानंतरच प्रचारात उतरायचे, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. वर्गणी, कार्यकर्त्यांचे नियोजन आणि इतर खर्चामुळे अनेकांचे पावसाळी पावले थांबले आहेत.

केंद्र सरकारने २०२१ ची जनगणना अद्याप प्रकाशित केलेली नसल्यामुळे, आगामी निवडणुका पुन्हा २०११ च्या जनगणनेच्या आधारेच घेण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रभागांची संख्या ४२ आणि नगरसेवकांची संख्या १६६ असण्याची शक्यता आहे. मागील सभागृहात नगरसेवकांची संख्या १६२ होती. मंगळवारी प्रभाग रचना सादर करण्याची मुदत संपली असून, प्रभाग रचनेचा अधिकृत कार्यक्रम आज जाहीर होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. एकदा का याबाबतचा अध्यादेश जाहीर झाला की, राजकीय पक्ष प्रचारासाठी सज्ज होतील आणि निवडणूक रंगेल, हे नक्की.







