पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांविरोधात पुण्यातील एस. एम. जोशी पुलावर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी आणि आयोजकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. 1 ऑक्टोबर रोजी बेकायदेशीर आंदोलन केल्याप्रकरणी 15 जणांवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक रस्त्यावर विनापरवाना गर्दी जमवून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

पोलीस हवालदार समीर पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, या गुन्ह्यात आंदोलनाचे मुख्य आयोजक प्रमोद पाटील आणि अक्षय कांबळे यांच्यासह अनिकेत देशमाने, प्रवीण पाटील, ऋषिकेश गांगुर्डे, प्रियंका चौधरी, नितीन गिते, सोमनाथ चव्हाण, ओंकार पाटील, गजानन शेळके, अजित काकडे, सिद्धार्थ पंचांगे, संकेत कणसे, सिद्धार्थ जांभूळकर आणि साहेबराव क्षीरसागर या 15 जणांचा समावेश आहे.

नेमका काय प्रकार घडला?

विद्यार्थी प्रतिनिधींनी 25 सप्टेंबर रोजी पोलीस आयुक्तालायाकडे निवेदनाद्वारे 2 ऑक्टोबर रोजी आंदोलनाची मागणी केली होती. प्रशासनाने अटी व शर्तींसह एस. एम. जोशी पुलाजवळ आंदोलनासाठी लेखी परवानगी दिली होती. मात्र, मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाल्याने विद्यार्थ्यांनी 2 ऑक्टोबरचे हे आंदोलन मागे घेतले. त्यामुळे पोलिसांनी दिलेला परवानगीचा आदेश रद्द करण्यात आला होता.
परंतु, 1ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 4 वाजेच्या सुमारास कोणतीही पूर्वकल्पना न देता विद्यार्थी प्रतिनिधींनी पुण्यातील शास्त्री रोड आणि एस. एम. जोशी पूल परिसरात अचानक गर्दी जमवली. कोणताही अधिकृत परवाना नसताना जमाव जमवून रस्ता रोखल्याने तसेच जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने पोलिसांनी ही कायदेशीर कारवाई केली आहे.







