लोणी काळभोर : लोणी काळभोरसह पुणे जिल्ह्यात इंटेरिअर डिझायनर म्हणून प्रसिद्ध असलेले विशाल शिवाजी खोले (वय 36) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील रिव्हर रिव्ह्यू सिटी येथे परिसरात घडली असून शनिवारी (ता. 10) सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेमुळे लोणी काळभोरसह परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विशाल खोले हे त्यांच्या राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत नातेवाइकांना आढळून आले. त्यानंतर नातेवाइकांनी त्यांना तातडीने लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना उपचारांपूर्वीच मृत घोषित केले.
आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट

विशाल खोले यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणातून उचलले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलिसांनी पुढील कार्यवाही सुरू केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी उरुळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात येणार असून, शवविच्छेदन अहवाल आणि पोलीस तपासातून मृत्यूबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. या घटनेमागील कारणांचा शोध घेण्यासाठी लोणी काळभोर पोलीस पुढील तपास करीत आहेत.







