मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांचे पुत्र अभिषेक बच्चन यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा दावा सोशल मीडियावरील एका पोस्टमधून करण्यात आला आहे. गँगस्टर गोल्डी ढिल्लोनच्या नावाने ही पोस्ट शेअर करण्यात आली असून, त्यात दोन्ही अभिनेत्यांना लक्ष्य करण्याची धमकी देण्यात आल्याचे म्हटले आहे. या पोस्टमुळे बॉलिवूडसह मुंबईत खळबळ उडाली आहे. मात्र, या पोस्टची सत्यता आणि ती नेमकी कुठून शेअर करण्यात आली, याची पडताळणी सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांचे मुंबईतील ‘जलसा’ निवासस्थान बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणाच्या तपासादरम्यान दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने विकास ठाकूर आणि दीपक सिंह या दोन कथित शूटर्सना अटक केली होती. विकास ठाकूरचा बिष्णोई गँगशी संबंध असल्याची माहितीही समोर आली होती.
या दोघांच्या अटकेनंतर गोल्डी ढिल्लोनच्या नावाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करण्यात आली. या पोस्टमध्ये अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा दावा आहे. तसेच, अटक करण्यात आलेल्या दोघांचा अन्य कोणत्याही गँगशी संबंध जोडू नये, असेही पोस्टमध्ये म्हटल्याचे समोर आले आहे.

गोल्डी ढिल्लोनच्या नावाने शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये दोन्ही आरोपींच्या अटकेमुळे कोणताही कट उधळला गेलेला नाही, असा दावा करण्यात आला आहे. तसेच, ‘मुंबईत आमचे आणखी २०० जण तयार आहेत’, असेही पोस्टमध्ये म्हटल्याचे सांगितले जात आहे.
याशिवाय शीख समाजाविरोधात बोलणाऱ्यांना आपला शत्रू मानणार असल्याचा इशाराही या पोस्टमधून देण्यात आला आहे. अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनी कितीही बुलेटप्रूफ केबिन तयार केल्या, तरी त्यांच्यावर हल्ला करू, अशा आशयाची धमकीही पोस्टमध्ये देण्यात आल्याचा दावा आहे.
या पोस्टसोबत #JusticeOf1984 आणि #GoldyDhillonGroup यांसारख्या हॅशटॅगचा वापर करण्यात आला आहे. मात्र, ही फेसबुक पोस्ट नेमकी कुठून आणि कोणी शेअर केली, तसेच गोल्डी ढिल्लोनचा या पोस्टशी प्रत्यक्ष संबंध आहे का, याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही.
दरम्यान, यापूर्वी टायगर श्रॉफ आणि अमिताभ बच्चन यांच्याशी संबंधित धमकीच्या चर्चांनंतर आता अभिषेक बच्चन यांचेही नाव समोर आल्याने या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या धमकीच्या पोस्टची दखल घेऊन पोलीस काय कारवाई करतात आणि बच्चन कुटुंबाच्या सुरक्षेबाबत कोणती पावले उचलली जातात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.






