राहुलकुमार अवचट

यवत : विश्रांतवाडी (पुणे) येथे 12 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या दुर्दैवी घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी आणि पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र नाभिक महामंडळ, दौंड तालुक्याच्या वतीने आज पाटस येथे मूक मोर्चा काढण्यात आला.

नाभिक समाजातील मुलीवर शेजारी राहणाऱ्या 52 वर्षीय आरोपीने अत्याचार केला होता. याप्रकरणी पोलीस प्रशासनाने आरोपीला 23 सप्टेंबर रोजी ताब्यात घेऊन त्याच्यावर बाल लैंगिक शोषणाविरुद्धच्या कायद्यान्वये कठोर गुन्हा दाखल केला आहे. पाटस येथे आयोजित मोर्चादरम्यान दौंड तालुक्यातील सर्व नाभिक व्यावसायिकांनी आपापली दुकाने पूर्णपणे बंद ठेवून या कृत्याचा निषेध केला. मोर्च्यानंतर पाटस पोलीस ठाण्यात निवेदन सादर करण्यात आले.

पोलीस प्रशासनाकडे सादर केलेल्या निवेदनात पुढील प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या:
कुटुंबाला सुरक्षा: पीडित कुटुंबाच्या जिवाला संभाव्य धोका लक्षात घेता त्यांना त्वरित २४ तास पोलीस संरक्षण देण्यात यावे.
फास्ट ट्रॅक न्यायालय: या प्रकरणाची सखोल चौकशी करून तात्काळ दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल करावे आणि खटला जलदगती (फास्ट ट्रॅक) न्यायालयात चालवावा.
कडक शिक्ष्याची मागणी: आरोपी सराईत गुन्हेगार असल्याने त्याला जामीन मिळू नये आणि त्याला फाशीचीच शिक्षा व्हावी यासाठी न्यायालयाने ठोस पुरावे सादर करावेत.
महिला अधिकाऱ्यांमार्फत तपास: या संपूर्ण गुन्ह्याचा तपास वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात यावा आणि पुणे पोलीस आयुक्तांनी यामध्ये थेट लक्ष घालून पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा.
आपल्या मुलींच्या सुरक्षिततेसाठी आणि समाजातील अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या निदर्शनांमध्ये नाभिक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण भागवत, दौंड तालुका अध्यक्ष गणेश साळुंके, महिला अध्यक्षा अश्विनी बंड, शशिकांत वाघमारे, मारुती पंडित, सुदाम गवळी, जीवन पवार यांच्यासह संघटनेचे इतर पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.







