पुणे: केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी रात्री त्यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड सविस्तर चर्चा झाल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांच्या अडचणी आणि केंद्राकडून मिळणारी मदत हे बैठकीतील महत्त्वाचे विषय असल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील दुष्काळाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्राला अधिक आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी अमित शाह यांच्याकडे केली. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्राकडून आवश्यक सहकार्य मिळावे, अशी भूमिका त्यांनी मांडल्याचे समजते. मात्र, या बैठकीतील चर्चेचा अधिकृत तपशील अद्याप समोर आलेला नाही.
अमित शाह दोन दिवसीय दौऱ्यासाठी पुण्यात दाखल झाले. लोहगाव विमानतळावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांचे स्वागत केले. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाइन उपस्थितीत गडचिरोली येथे आयोजित कार्यक्रमामुळे मुख्यमंत्री फडणवीस पुण्यातील दिवसभराच्या कार्यक्रमांना उपस्थित राहू शकले नाहीत. त्यानंतर रात्री त्यांनी शाह यांची भेट घेतली.

या बैठकीत महायुतीतील मित्रपक्षांमधील मतभेद, राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चा आणि राज्यातील काँग्रेसची राजकीय स्थिती यावरही आढावा घेतल्याची चर्चा आहे.

दरम्यान, बैठकीत नेमके कोणते निर्णय झाले, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या मागणीवर केंद्र सरकार काय निर्णय घेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.






