सागर जगदाळे

भिगवण, ता.१६: गावाचा विकास, नागरिकांच्या समस्या आणि सार्वजनिक हिताचे प्रश्न हे कोणत्याही पदापेक्षा मोठे असतात. मात्र तक्रारवाडीतील सध्याच्या राजकीय वातावरणाकडे पाहता, गावातील काही गावपुढाऱ्यांची भूमिका चर्चेचा विषय ठरत आहे. पद मिळाले तर काम करायचे आणि पद नसेल तर गावाच्या प्रश्नांपासून दूर राहायचे, अशीच काहीशी मानसिकता निर्माण झाली आहे का, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
निवडणुकीचा काळ जवळ आला की नागरिकांच्या दारोदारी भेटीगाठी, सुख-दुःखात सहभाग, विकासाची आश्वासने आणि गावाच्या हिताच्या गप्पा रंगू लागतात. मात्र निवडणुका संपल्यानंतर याच नागरिकांच्या दैनंदिन समस्यांवर किती जण सातत्याने आवाज उठवतात? गावातील पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, पथदिवे आणि इतर सार्वजनिक सुविधांचे प्रश्न उपस्थित झाल्यानंतर प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी किती जण पुढे येतात, हा खरा प्रश्न आहे.

अलीकडेच तक्रारवाडीतील वार्ड क्रमांक दोनमध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनला लागलेल्या गळतीचा प्रश्न दीड महिन्यापासून प्रलंबित असल्याचे समोर आले. अशा प्रश्नांवर गावातील पुढारी एकत्र येऊन प्रशासनाला जाब विचारणार का? नागरिकांच्या समस्यांसाठी पुढाकार घेणार कोण? की पद आणि जबाबदारी मिळाल्यानंतरच काम करण्याची भूमिका राहणार?

वास्तविक गावाच्या विकासासाठी काम करण्याकरिता कोणत्याही पदाची आवश्यकता नसते. प्रशासनाकडे प्रश्न मांडणे, कामाचा पाठपुरावा करणे, नागरिकांच्या अडचणी समजून घेणे आणि सार्वजनिक हितासाठी पुढाकार घेणे ही सामाजिक बांधिलकी आहे. पद हे काम करण्याचे साधन असते, काम न करण्याचे कारण नव्हे!
तक्रारवाडीतील नागरिकांना आता केवळ आश्वासनांची नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीची अपेक्षा आहे. पद मिळाल्यानंतर काम करण्याची तयारी दाखवणाऱ्यांपेक्षा पद नसतानाही गावासाठी धावून येणारे नेतृत्व नागरिकांना अधिक महत्त्वाचे वाटणार आहे.






