पुणे : पुणे-सातारा रस्त्यावरील बीआरटी मार्गात पीएमपी बस चालकाने अचानक जोरात ब्रेक दाबल्याने बसमधील प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली. एका महिलेला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाने अचानक ब्रेक लावल्याने बसमधील चार ते पाच प्रवासी जखमी झाले. यामध्ये एका महिला प्रवाशाला गंभीर दुखापत झाली असून, तिचे पाच दात तुटले आहेत. या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सातारा रस्त्यावरील के. के. मार्केट परिसरातील बीआरटी मार्गातून पीएमपी बस जात होती. त्यावेळी एक महिला अचानक बससमोर आल्याने तिला वाचवण्यासाठी चालकाने जोरात ब्रेक दाबला. बसला अचानक बसलेल्या जोरदार झटक्यामुळे बसमधील चार ते पाच प्रवासी खाली पडले किंवा आदळल्याने जखमी झाले.
या घटनेत ज्योती मयूर दिघे (वय ३६, रा. कात्रज) यांना सर्वाधिक गंभीर दुखापत झाली. चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने त्यांचा तोल गेला आणि चेहरा समोरील लोखंडी गजावर जोरात आदळला. या धडकेत त्यांचे पाच दात तुटले. तुटलेले दात ओठात घुसल्याने मोठी दुखापत झाल्याचे त्यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.

घटनेनंतर ज्योती दिघे यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात धाव घेत बसचालकाविरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी चालकाविरोधात गुन्हा नोंदवला आहे. पोलीस हवालदार राऊत या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

या घटनेमुळे बीआरटी मार्गात नागरिकांकडून होणारी अनधिकृत घुसखोरी आणि त्यामुळे बसमधील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा निर्माण होणारा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.






