सांगली : पुण्यातील एका खासगी शिक्षण संस्थेत काम करणाऱ्या आणि खासगी क्लासेस घेणाऱ्या ३० वर्षीय उच्चशिक्षित विवाहितेची तिच्याच प्रियकराने निर्घृण हत्या केल्याची घटना सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात घडली आहे. दिवाळीच्या सुट्टीनिमित्त गावी आलेल्या या महिलेवर तिच्या आईसमोरच धारदार चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तिचा जागीच मृत्यू झाला. राजाक्का काशीराम खरात (वय ३०) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी जत पोलिसांनी काही तासांतच मुख्य संशयित मनोज हिम्मतराव कोळेकर (वय ३०, रा. कंठी) याच्यासह त्याच्या एका साथीदाराला ताब्यात घेतले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, राजाक्का यांचा आठ वर्षांपूर्वी त्यांच्याच नात्यातील काशीराम खरात यांच्याशी विवाह झाला होता. त्या पुण्यातील एका खासगी शिक्षण संस्थेत नोकरी करत होत्या. तसेच खासगी क्लासेसही घेत होत्या. दिवाळीच्या सुट्टीनिमित्त त्या दहा दिवसांपूर्वी जत तालुक्यातील कंठी गावालगत असलेल्या मोठेवाडी येथील खरात वस्तीवर आल्या होत्या.
दरम्यान, राजाक्का यांचे कंठी परिसरातील मनोज कोळेकर याच्यासोबत गेल्या पाच वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राजाक्का यांनी या नात्यापासून अंतर ठेवण्यास सुरुवात केली होती.

रविवारी सायंकाळी मनोज याने राजाक्का यांना भेटण्यासाठी आणि पुन्हा प्रेमसंबंध ठेवण्यासाठी तगादा लावल्याची माहिती आहे. मात्र, राजाक्का यांनी त्याला स्पष्ट नकार दिला. तसेच त्याचे फोन उचलणेही बंद केले होते. याच रागातून मनोजने त्यांच्यावर हल्ला केल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.

मनोज हा आपल्या एका साथीदारासह थेट खरात वस्तीवरील राजाक्का यांच्या घरी पोहोचला. त्यानंतर त्याने राजाक्का यांच्या पोटावर आणि शरीराच्या अन्य भागांवर धारदार चाकूने वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या राजाक्का यांचा जागीच मृत्यू झाला. हा संपूर्ण प्रकार त्यांच्या आईसमोर घडल्याचे सांगितले जात आहे.
घटनेची माहिती मिळताच जत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत मुख्य संशयित मनोज हिम्मतराव कोळेकर आणि त्याच्या एका साथीदाराला काही तासांतच ताब्यात घेतले. या हत्येमागील नेमके कारण आणि घटनेचा संपूर्ण तपशील जाणून घेण्यासाठी पोलीस पुढील तपास करत आहेत.
या घटनेमुळे जत तालुक्यासह सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.






