पुणे: पुणे रेल्वे स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पुणे रेल्वे यार्डमधील डाऊन मिरज मुख्य मार्गावरील डी.डी.एस. पॉइंटच्या उन्नतीकरणासाठी रविवारी (११ ऑक्टोबर) सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत नऊ तासांचा विशेष रेल्वे ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत रेल्वेच्या वाहतूक आणि विद्युत विभागाशी संबंधित कामे केली जाणार आहेत. या ब्लॉकमुळे पुणे स्थानकावरील काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले असून दोन डेमू गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

ब्लॉकदरम्यान पुणे रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक २ आणि ३ च्या वापरावर निर्बंध असतील. हडपसरच्या दिशेने येणाऱ्या आणि जाणाऱ्या गाड्यांना फलाट क्रमांक २ वापरता येणार नाही. तसेच सासवड रोडच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांसाठी फलाट क्रमांक २ आणि ३ उपलब्ध नसतील. त्यामुळे काही गाड्यांचे थांबे पुणे स्थानकाऐवजी खडकी किंवा हडपसर येथे ठेवण्यात आले आहेत.
रविवारी सातारा-पुणे डेमू (७१४२०) आणि पुणे-दौंड डेमू (७१४०७) या दोन गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय मुंबई-पुणे मार्गावरील डेक्कन एक्स्प्रेसच्या दोन्ही फेऱ्या धावणार नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून पुण्याकडे येणारी गाडी क्रमांक ११००७ आणि पुण्याहून मुंबईकडे जाणारी गाडी क्रमांक ११००८ रद्द करण्यात आली आहे.

बारामती-पुणे डेमू (७१४०६) ही गाडी पुणे स्थानकापर्यंत न येता दौंडपर्यंतच धावणार आहे. जयपूर-पुणे एक्स्प्रेस (१२९४०) आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेस (१२१२७) या गाड्यांना खडकी स्थानकात थांबा देण्यात येणार आहे. तर नागपूर-पुणे (१२१३६), जम्मू तवी-पुणे (११०७८) आणि अमरावती-पुणे (११४०६) या गाड्यांचा प्रवास हडपसर स्थानकात संपेल.

या बदलांमुळे रविवारी रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी घरातून निघण्यापूर्वी आपल्या गाडीचे वेळापत्रक, थांबे आणि उपलब्ध सेवा तपासून घ्याव्यात, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.







