धुळे : जिल्ह्यातील सावळदे (मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग) येथील तापी नदीच्या पात्रात एका नवविवाहित दांपत्याचे मृतदेह अत्यंत संशयास्पद स्थितीत आढळून आले आहेत. पाण्यावर तरंगणारे मृतदेह पाहून स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही मृतदेह बाहेर काढले तेव्हा दोघांचेही पाय लोखंडी साखळीने एकत्र बांधून त्याला कुलूप लावलेले आढळले.

मृत व्यक्तींची ओळख पटली असून, शाम हरी पाटील (वय 35) आणि सपना शाम पाटील अशी त्यांची नावे आहेत. हे दाम्पत्य जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील पाडळसे येथील रहिवासी होते. नदीवरील पुलाजवळ त्यांची दुचाकीही सापडली आहे. दोघांनी काही काळापूर्वीच प्रेमविवाह केला होता.

दोघांचे पाय साखळीने मजबूत कुलूप लावून बांधलेले असल्याने हा प्रकार केवळ आत्महत्या आहे की त्यांची निर्घृण हत्या करून मृतदेह नदीत फेकून देण्यात आले, याबाबत मोठा संशय निर्माण झाला आहे. प्रेमविवाहाच्या कारणावरून ही ‘ऑनर किलिंग’ची घटना असावी असा प्राथमिक संशयही काही स्थानिकांकडून व्यक्त केला जात आहे.

या धक्कादायक घटनेमुळे धुळे आणि जळगाव परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी नरडाणा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहेत. नरडाणा पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्यात आली असून, हा घातपात आहे की आत्महत्या, याचा शोध घेण्यासाठी पोलीस सर्व बाजूंनी कसून तपास करत आहेत.






