पुणे : प्रशांत महासागराच्या पृष्ठभागावरील तापमानात वेगाने वाढ होत असून, येत्या काही महिन्यांत अत्यंत तीव्र ‘एल निनो’ निर्माण होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अमेरिकेच्या हवामान अंदाज केंद्राच्या 8 ऑक्टोबर 2026 च्या अहवालानुसार, 2026 च्या अखेरीस आणि 2027 च्या सुरुवातीला या स्थितीचा प्रभाव सर्वाधिक असण्याची शक्यता आहे.

विषुववृत्तीय प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील भागात समुद्राचे तापमान सामान्यपेक्षा 4 अंश सेल्सिअसहून अधिक नोंदवले गेले आहे. तसेच हवामानशास्त्रात अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ‘निनो 3.4’ या क्षेत्रातील तापमान सरासरीपेक्षा 2.1 अंश सेल्सिअसने वाढले आहे. समुद्रातील ही विक्रमी उष्णता एल निनो अधिक मजबूत होत असल्याचे स्पष्ट संकेत देते.

हवामान तज्ज्ञांच्या मते, या एल निनोची तीव्रता 1950 सालापासून आतापर्यंत नोंदवलेल्या काही मोठ्या घटनांनाही मागे टाकू शकते. अमेरिकेच्या हवामान संस्थेने ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत ऐतिहासिक पातळीवरील एल निनो विकसित होण्याची शक्यता 83% व्यक्त केली आहे.

भारतावर काय परिणाम होऊ शकतो?
सामान्यतः एल निनोच्या प्रभावामुळे जागतिक तापमानात मोठी वाढ होते आणि पावसावरही मोठा परिणाम होतो.भारतात एल निनोचा थेट संबंध कमकुवत मान्सूनशी जोडला जातो. यामुळे देशातील पाणीसाठा, शेती आणि उन्हाळ्यातील तापमानाबाबत चिंता वाढू शकते.
मात्र, प्रत्येक एल निनोमुळे भारतात दुष्काळ किंवा विक्रमी उष्णता पडेलच असे नाही. आगामी 2027 चा उन्हाळा तीव्र असेल किंवा जूनमधील मान्सून कमकुवतच राहील, असा कोणताही अंतिम निष्कर्ष आत्ताच काढता येत नाही. मान्सूनची खरी परिस्थिती भारतीय हवामान विभागाच्या पुढील काही महिन्यांतील अधिकृत अंदाजांवर आणि स्थानिक हवामान घटकांवर अवलंबून असेल.
एकंदरीत, प्रशांत महासागरातील ही घडामोडी जागतिक हवामानासाठी मोठी ठरणार असून, आगामी काळात पावसाच्या वितरणावर आणि तापमानावर बारकाईने लक्ष ठेवावे लागणार आहे






