पुणे : घरगुती वीज कनेक्शन मंजुर करुन देण्यासाठी 25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना सहायक अभियंता व एका खाजगी इसमाला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई महावितरण कार्यालय, स्पाईन सिटी उपविभाग -2, भोसरी, पुणे, येथे आज गुरुवारी (ता. 05) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली असून, या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.

सहायक अभियंता रामप्रसाद नरवडे (वय -34 , महावितरण कार्यालय, स्पाईन सिटी उपविभाग-2, भोसरी, पुणे. (वर्ग-2) व खाजगी इसम श्यामलाल असोकन, (वय 34, रा. फ्लॅट नं. 1105 सिल्वर, बोराटेवाडी, मोशी, पुणे), असे लाच स्वीकारणाऱ्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे एका शासकिय विद्युत ठेकेदाराने तक्रार दिली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे शासकिय विद्युत ठेकेदार असून त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांसाठी महावितरण कंपनीचे लायझनिंग व विज कनेक्शन मंजुरीचे काम करतात. तक्रारदार यांनी बुधवारी (ता. 04) महावितरण कार्यालय, भोसरी येथे एका ग्राहकाच्या घरगुती वीज कनेक्शन संदर्भात अर्ज केला होता. सदरचा अर्ज लोकसेवक रामप्रसाद नरवडे यांच्याकडे कार्यवाहीसाठी आलेला होता.

सदर अर्जावर कार्यवाही करुन घरगुती कनेक्शन मंजुर करुन देण्यासाठी रामप्रसाद नरवडे यांनी तक्रारदारांकडे 35 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती 25 हजार रुपयाच्या लाचेची मागणी केल्याबाबतची तक्रार सोमवारी (ता. 02) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.
दरम्यान, प्राप्त तक्रारीच्या आधारे एसीबीने गंभीर दखल घेत आरोपीला पकडण्यासाठी सापळा रचला. त्यात लाचेची रक्कम स्वीकारताना रामप्रसाद नरवडे व त्यांच्या कार्यालयामध्ये हजर असलेला ओळखीचा खाजगी इसम श्यामलाल असोकन 25 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी दोघांवर भोसरी एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन 1988 चे कलमान्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, व अपर पोलीस अधीक्षक डॉ. शितल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.







