पुणे : पिंपरी-चिंचवड येथे झालेल्या विधानसभा उपाध्यक्षांच्या नागरी सत्कार सोहळ्यात सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. पिंपरी-चिंचवडकरांच्या आर्थिक परिस्थितीचे कौतुक करताना शिरसाट यांनी मराठवाड्यातील जनतेचा ‘कर्मदरिद्री’ असा उल्लेख केल्याचे समोर आले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून मराठवाड्यातील नागरिक आणि विविध संघटनांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

कार्यक्रमात बोलताना शिरसाट यांनी पिंपरी-चिंचवडकरांच्या श्रीमंतीचा दाखला देताना एका कार्यक्रमातील प्रसंग सांगितला. कलाकाराला प्रेक्षकांकडून ५०० रुपयांच्या नोटा दिल्या जात असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी तुलना करताना त्यांनी, “पिंपरी-चिंचवडकर कालही श्रीमंत होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील,” असे म्हटले. त्यानंतर मराठवाड्यातील नागरिकांचा उल्लेख करताना तेथील लोक खिशातून १०० रुपयेही काढत नाहीत आणि काढले तर लगेच फोटो काढतात, असे वक्तव्य त्यांनी केले.

शिरसाट यांच्या या विधानावरून विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत. मराठवाडा हा दुष्काळ, शेतीविषयक अडचणी आणि आर्थिक संकटांसह अनेक प्रश्नांना सामोरा जाणारा प्रदेश आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर जबाबदार पदावरील मंत्र्याने नागरिकांसाठी अशा प्रकारचा शब्दप्रयोग करणे योग्य नसल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांच्या आर्थिक क्षमतेचे उदाहरण देताना मराठवाड्यातील जनतेशी केलेली तुलना आता चर्चेचा विषय ठरली आहे. शिरसाट यांच्या वक्तव्याचा नागरिक आणि विविध संघटनांकडून निषेध करण्यात येत असून, या विधानामुळे मराठवाड्याच्या अस्मितेचा अवमान झाल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान, या वक्तव्यावरून पुढील काळात राजकीय प्रतिक्रिया वाढण्याची शक्यता असून, शिरसाट यांच्याकडून या विधानाबाबत स्पष्टीकरण दिले जाते का, याकडेही लक्ष लागले आहे.







