जालना: राज्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर होत असताना आता पाणीसाठ्याच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धामणा धरणावर पाण्यासाठी पोलिसांचा खडा पहारा ठेवण्यात आला आहे. धरणातील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले असून, त्याचा अवैध उपसा होऊ नये यासाठी पोलीस, महसूल प्रशासन आणि पाटबंधारे विभागाचे संयुक्त पथक तैनात करण्यात आले आहे.

मराठवाड्यात पावसाअभावी जलसाठे कमी होत चालले आहेत. त्यामुळे उपलब्ध पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेतला जात आहे. धामणा धरणातील पाण्याचा अवैध उपसा किंवा चोरी होऊ नये, यासाठी संयुक्त पथकाकडून दिवस-रात्र धरण परिसरात गस्त घातली जात आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे भविष्यात पाण्यावरून वाद होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने ही खबरदारी घेतली आहे.

सहायक पोलीस निरीक्षक अमोल खामगळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटबंधारे विभागाने बंदोबस्ताची मागणी केली होती. त्यासाठी अधिकृत पत्र मिळाल्यानंतर पोलिसांचा बंदोबस्त धामणा धरणावर लावण्यात आला आहे. पाटबंधारे विभागाच्या पाहणीवेळी तसेच त्यांच्या मागणीनुसार धरण आणि जलसाठ्याच्या परिसरात पोलिसांची उपस्थिती राहणार आहे. अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी नियमित पेट्रोलिंग करण्यात येत आहे. सध्या तरी धरणातील पाण्याचा अवैध साठा किंवा उपसा झाल्याचे निदर्शनास आलेले नसल्याचे खामगळ यांनी सांगितले.

दरम्यान, यंदा पावसाने मोठी ओढ दिल्याने महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये शेतीवर संकट आले आहे. मराठवाड्यातील परिस्थिती विशेष गंभीर असून, खरीप हंगामातील मका, तूर, कपाशी आणि बाजरी यांसारखी पिके पाण्याअभावी करपून गेली आहेत. काही ठिकाणी फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे. ऐन फुलोऱ्यात असलेल्या पिकांना पाणी न मिळाल्याने उत्पादनाच्या अपेक्षा मावळल्या असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत धरणांमधील उपलब्ध पाण्याचे संरक्षण करणे प्रशासनासाठी महत्त्वाचे ठरत आहे.







