आदित्य बोराटे

इंदापूर: हातउसने घेतलेले पैसे परत न दिल्याच्या कारणावरून तरुणाला शिवीगाळ व दमदाटी करून काठी आणि लोखंडी पाइपने मारहाण केल्याची घटना निमगाव केतकी येथे घडली. याप्रकरणी अमन रियाज अहमद पठाण (वय २३, रा. निमगाव केतकी, ता. इंदापूर) यांनी इंदापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार धनाजी महादेव शिंदे (रा. व्याहळी, ता. इंदापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. ६) सायंकाळी साडेसात ते साडेआठच्या सुमारास निमगाव केतकी गावच्या हद्दीत फिर्यादी यांच्या राहत्या घरासमोर, निमगाव केतकी–व्याहळी रस्त्यावर तसेच वडापुरे कॉम्प्लेक्ससमोर ही घटना घडली.

फिर्यादी अमन पठाण यांच्या तक्रारीनुसार, हातउसने घेतलेले पैसे न दिल्याच्या कारणावरून धनाजी शिंदे हे सिल्वर रंगाच्या टाटा नेक्सॉन मोटारीतून आले. त्यांनी चारचाकी वाहन फिर्यादी यांच्या टेम्पोला आडवे लावले. त्यानंतर शिवीगाळ व दमदाटी करून काठी आणि लोखंडी पाइपने पायावर मारहाण केल्याने फिर्यादी जखमी झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी इंदापूर पोलिस ठाण्यात दखलपात्र गु.र.नं. ६३७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ११८(१), १२६(२), ३५२ आणि ३५१ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्याची तसेच तपासाची कार्यवाही पोलीस हवालदार काळे (बकल नं. ५१९) करीत आहेत.






